Kabaddi Game Guide Rules, Format: कबड्डी हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. या खेळाचा इतिहास ४००० वर्ष जुना आहे. भारताने या खेळात खूप प्रगती केली आहे. कबड्डी या खेळाची सुरूवात भारतात झाली. पण हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो. दरम्यान या खेळाचे नियम काय आहेत आणि हा खेळ कसा खेळला जातो? जाणून घ्या.

कबड्डीच्या मैदानाची लांबी आणि रुंदी किती असते?

कबड्डी हा खेळ समजून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कबड्डीचं मैदान कसं असतं, हे समजून घ्यावं लागेल. कबड्डी हा खेळ लाल मातीच्या मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. पण आता लोकप्रियता वाढल्यानंतर हा खेळ मॅटवर खेळला जाऊ लागला आहे. मैदानाची लांबी आणि रुंदी ही खेळाडूंच्या वयोगटानुसार वेगळी असते. तसेच पुरुष कबड्डी स्पर्धेसाठी आणि महिलांच्या कबड्डी स्पर्धेसाठीही मैदानाची लांबी, रुंदी वेगळी असते. पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेसाठी मैदानाचं माप हे १३ मीटर लांब आणि १० मीटर रुंद इतकं असतं. तर महिलांच्या स्पर्धेत मैदानाचं माप हे १२ मीटर लांब आणि ७ मीटर रुंद असते.

एक मोठे आयताकृती मैदान असते. मैदानाच्या मध्यभागी विभागणी करण्यासाठी एक रेष असते, जी मध्यरेषा (मिड लाईन) म्हणून ओळखली जाते. तर दोन्ही बाजूला टच लाईन आणि बोनस लाईन असते. तर मैदानाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एक रेष ओढली जाते, जी लॉबी म्हणून ओळखली जाते. मैदान नेमकं कसं असतं हे तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता.

एक सामना किती वेळ सुरू राहतो?

कबड्डीत एका सामन्यासाठी ४० मिनिटांचा अवधी दिला जातो. ही ४० मिनिटे २०-२० अशी २ टप्प्यात विभागली जाते. सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक केलं जातं. नाणेफेक जिंकणारा कर्णधार आधी बचाव करणार की चढाई करणार हे ठरवतो. प्रत्येक संघ विश्रांतीसाठी आणि रणनीती आखण्यासाठी २ वेळा टाईमआऊट घेऊ शकतात. यादरम्यान प्रशिक्षक खेळाडूंसोबत संवाद साधू शकतात. पण यादरम्यान जे खेळाडू मैदानात आहेत, ते बाहेर जाऊ शकत नाहीत आणि प्रशिक्षकांना देखील मैदानाच्या आत येण्याची अनुमती नसते.

कबड्डीसाठी किती खेळाडूंची आवश्यकता असते?

कबड्डी हा खेळ ७ खेळाडूंचा आहे. संपूर्ण संघात १० ते १२ खेळाडू असतात जे राखीव खेळाडू असतात पण ते देखील बदली खेळाडू म्हणून मैदानात येऊ शकतात. हे ७ खेळाडू बचाव (डिफेंस) आणि चढाई (रेड) करू शकतात. बचावात मुख्यत: उजवा टर्न, डावा टर्न, उजवा कॉर्नर आणि डावा कॉर्नर अशी पोझिशन्स असते. या बचावपटूंच्या हाताखाली ३ चढाईपटू असतात. जे चढाईत गुण आणून देण्याचं काम करतात. तर बचावपटू विरोधी संघातील चढाईपटूची पकड करून गुण आणून देण्याचं काम करत असतात.

कबड्डी खेळ कसा खेळतात?

आता तुम्हाला कबड्डी मैदानाची लांबी-रुंदी, वेळ, किती खेळाडू असतात हे समजलं आहे. पण हा खेळ कसा खेळतात? हे जाणून घ्या. दोन्ही संघांना आळीपाळीने रेड करण्याची संधी मिळते. पंचांटी शिट्टी वाजल्यानंतर पहिल्या टप्प्यातील २० मिनिटांचा खेळ सुरू होतो. ज्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून रेडला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो रेडर रेड सुरू करतो. रेड पूर्ण करण्यासाठी ३० सेकंदांची वेळ दिली जाते. यादरम्यान रेडरला ३० सेकंद कबड्डी कबड्डी..असं बोलत राहणं बंधनकारक असतं. रेड करत असताना रेडरने टच लाईन ओलांडली की ती रेड ग्राह्य धरली जाते. टच लाईन न ओलांडताच जर रेडर आपल्या कोटमध्ये परतला, तर त्याला बाद घोषित केलं जातं. असं झाल्यास विरोधी संघाला १ गुण दिला जातो. यासह रेडरकडे बोनस रेषा ओलांडून १ गुण घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो.

रेडरचं मुख्य काम विरोधी संघातील खेळाडूंना स्पर्श करून आपल्या कोटमध्ये परतणं असतं. तो जितक्या खेळाडूंना स्पर्श करेल ते खेळाडू बाद होतील आणि संघाला गुण मिळतील. यादरम्यान बचाव करत असलेले बचावपटू रेडरला पकडण्याचा प्रयत्न करतात. कबड्डी या खेळात सर्व ७ खेळाडू बाद झाल्यानंतर सामना संपत नसतो, पुन्हा एकदा सर्व ७ खेळाडू मैदानात उतरतात. ४० मिनिटे हा खेळ असाच सुरू राहतो.

कबड्डी या खेळात गुण कसे दिले जातात?

या खेळात रेडर २ पद्धतीने गुण घेऊ शकतात. जर रेडर रेड करत असताना विरोधी संघातील बचावपटूंना स्पर्श करून आपल्या कोटमध्ये परतला, तर गुण दिला जातो. यासह बोनस रेषा ओलांडून देखील गुण मिळवू शकतो. तर बचावपटू रेडरला पकडून गुण मिळवतात. जर सर्व ७ खेळाडू बाद झाले, तर विरोधी संघाला २ अतिरिक्त गुण दिले जातात.

प्रो कबड्डी खेळातील नियम

प्रो कबड्डी लीग स्पर्धा सुरू झाल्यापासून कबड्डीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार प्रत्येक रेडरला आपली रेड पूर्ण करण्यासाठी ३० सेकंदांचा वेळ दिला जातो. यादरम्यान जर रेडरने लागोपाठ २ रेडमध्ये एकही गुण कमावलेला नसेल. तर तिसरी रेड ही डू ओर डाय रेड असते. या रेडमध्ये जर तो गुण आणू शकला नाही, तर त्याला बाद घोषित केलं जातं. जर एका रेडरने ३ किंवा त्याहून अधिक गुणांची कमाई केली, तर या रेडला सुपर रेड असं म्हटलं जातं. जर ३ किंवा त्याहून कमी बचावपटूंनी यशस्वी पकड केली, तर त्याला सुपर टॅकल असं म्हटलं जातं. सुपर टॅकलला १ अतिरिक्त गुण दिला जातो.