आंतरराष्ट्रीय आणि प्रो-कबड्डीत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या काशिलिंग अडकेला अटक करण्यात आलेली आहे. वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे घरात तीनपत्त्यांचा जुगार आणि दारुअड्डा चालवल्याप्रकरणी काशिलिंग अडकेसह आठ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ६१ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासेगाव येथील काशिलिंग अडकेच्या घरात जुगार आणि दारुचा अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्री पोलिस पथकाने काशिलिंगच्या घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान काही लोकं पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्या सर्वांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत पोलिसांनी काशिलिंग अडके, पांडुरंग पाटसुते, आरिफ मुल्ला, अतुल परीट, रसिक नायकवडी, हर्षल पाटील, जोतिराम पाटील यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटारसायकल, विदेशी दारु असा १ लाख ६१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान करोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन असतानाही असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi player kashiling adke arrested for running gambling den in sangli district psd
First published on: 14-04-2020 at 22:31 IST