मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले जात असतानाच, दुसरीकडे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड हे रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत असून त्यांच्यावरील उपचारांसाठी माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मदतीचे आवाहन केले आहे. यामुळे एकीकडे विश्वचषक विजेत्या संघाला कोट्यवधीची बक्षीसे दिली जातात, आयपीएलच्या निमित्ताने हजारो कोटींची उलाढाल होते आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेटच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे असे चित्र या निमित्ताने दिसत आहे.

हेही वाचा >>> Ricky Ponting : दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कोच; खास पोस्टसह पॉन्टिंगला अलविदा

गायकवाड यांना आर्थिक मदत करावी अशी विनंती करणारे पत्र कपिल देव यांनी बीसीसीआयला लिहिले आहे. भारतासाठी सुमारे १२ वर्षांच्या कालावधीत ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळणारे आणि दोन वेळा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावलेले अंशुमन गायकवाड यांच्यावरील आरोग्यविषयक आणि आर्थिक संकटाकडे कपिल यांनी बीसीसीआयचे लक्ष वेधले आहे.

गायकवाड यांच्यावर गेल्या एका वर्षापासून लंडनमधील किंग्ज कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती करताना आपल्याला वेदना होत आहेत, असे कपिल यांनी या पत्रात लिहिले आहे. आपण स्वत: आपल्या पेन्शनची सर्व रक्कम त्यासाठी द्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मोहिंदर अमरनाथ, सुनील गावस्कर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदन लाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद हे आपले माजी सहकारी ७१ वर्षीय गायकवाड यांच्यावरील उपचाराकरिता निधी उभारण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत, असेही कपिल यांनी मंडळाला कळवले आहे. माजी खेळाडूंना मदत करण्यासाठी ट्रस्टसारखी व्यवस्था नाही याकडेही कपिल यांनी लक्ष वेधले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला वेदना होत आहेत कारण मी अंशुबरोबर खेळलो आहे आणि त्याला या अवस्थेत पाहू शकत नाही. अंशुसाठी कोणतीही मदत तुमच्या हृदयातून आली पाहिजे. काही भीतीदायक जलदगती गोलंदाजांना तोंड देताना त्याने स्वत:च्या चेहऱ्यावर आणि छातीवर चेंडू झेलले आहेत. आता आपण त्याच्यासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे. – कपिल देव, माजी कर्णधार