नवी दिल्ली : खेळ आणि राजकारण वेगळेच ठेवले पाहिजे याचा पुनरुच्चार करताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी खेळाडू आणि माध्यमांना अधिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.
नुकत्याच झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या संघांत बराच संघर्ष पाहायला मिळाला. मैदानावरील खेळापेक्षा, उभय संघांतील खेळाडूंच्या विविध कृती, मैदानाबाहेरील राजकारण याचीच चर्चा अधिक रंगली. भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या खेळाडूंनीही विविध कृती करून भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
या स्पर्धेची सांगताही वादग्रस्त ठरली. भारतीय संघाने विजेत्याला मिळणारा करंडक आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून घेण्यास नकार दिला. नक्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये अंतर्गत सुरक्षामंत्रीही आहेत. भारतीय संघाने त्यांच्याकडून करंडक स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर नक्वी थेट करंडक घेऊनच पारितोषिक वितरणाच्या ठिकाणहून चालते झाले. या सर्व गोष्टी खेळासाठी योग्य नसल्याचे कपिल यांना वाटते.
‘‘माध्यमांनी अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. तुम्ही खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ करणे थांबवले पाहिजे. तसेच खेळाडूंनीही खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे. तसे झाल्यास परिस्थितीत बरीच सुधारणा होऊ शकेल,’’ असेही कपिल म्हणाले. आशिया चषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध तीनही सामने जिंकले.
पाकिस्तान क्रिकेट सध्या फारशा चांगल्या स्थितीत नसल्याचेही कपिल यांनी नमूद केले. ‘‘८०, ९०च्या दशकातील पाकिस्तानचा संघ आणि आताचा पाकिस्तान संघ यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. पूर्वी त्यांच्याकडे जावेद मियांदाद, झहीर अब्बास, वकार युनुस आणि वसीम अक्रम यांसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू होते. आता अशा प्रतिभावान खेळाडूंची पाकिस्तान संघात वानवा आहे,’’ असे मत कपिल यांनी व्यक्त केले.