आयपीएलने स्थानिक खेळाडूंचे भले केले, त्यांना पैसा आणि ग्लॅमर मिळवून दिले याचा पुन्हा एकदा प्रत्यय लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आला. पहिल्या दिवशी नावाजलेल्या खेळाडूंच्या लिलावात कोटी कोटी उड्डाणे पाहायला मिळाली, पण दुसऱ्या दिवशीही स्थानिक खेळाडूंना संघात घेताना मालकांनी हात आखडता घेतला नाही. दुसऱ्या दिवशीच्या लिलावात सरस ठरला तो रेल्वेच्या संघातील अष्टपैलू खेळाडू करण शर्मा. सनरायजर्स हैदराबाद संघाने करणला तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले, तर ऋषी धवनलाही यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने ३ कोटी रुपये देत संघात स्थान दिले. यंदाच्या रणजी मोसमात महाराष्ट्राकडून सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करणाऱ्या केदार जाधवला दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने दोन कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतले.
गेल्या आयपीएलमध्ये ‘लेग स्पिनर’ करण हैदराबादच्याच संघात होता आणि त्याने चमकदार कामगिरीही केली होती. गेल्या मोसमात त्याने १३ सामन्यांमध्ये ११ बळी मिळवले होते आणि त्यावेळी त्याची सरासरी होती फक्त ६.६०. करणची लिलावासाठी ६५ लाख ही मूळ किंमत होती, त्यामुळेच त्याच्या नावावर जास्त बोली लागत होत्या. पण अखेर हैदराबादने ३ कोटी ७५ लाखाची सर्वाधिक बोली लावत त्याला संघात घेतले.
यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक बळी रिषीच्या नावावर होत्या. त्यामुळे त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला जोरदार मागणी होती. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये असली तरी त्याला संघात घेण्यासाठी पंजाबच्या संघाला ३ कोटी रुपये मोजावे लागले.
रणजीचे उपविजेत्या ठरलेल्या महाराष्ट्राच्या संघाचा फलंदाजीतील आधारस्तंभ आणि यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या केदार जाधवला यावेळी लिलावात चांगलाच भाव मिळाला. केदारची लिलावातील मूळ किंमत ३० लाख रुपये होती, पण त्याच्यावर जबरदस्त बोलींचा वर्षांव होत होता. हैदराबादने त्याच्यावर सर्वोच्च २ कोटींची बोली लावली होती, पण दिल्लीने आपला ‘राइट टू मॅच’ हा अधिकार वापरत त्याला आपल्याकडे घेतले. केदार आयपीएलच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे होता, पण २०१० साली त्याला दिल्लीने आपल्या ताफ्यात घेतले होते. दिल्लीकडून पहिला सामना खेळताना त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात २९ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतरच्या मोसमात त्याला कोची टस्कर्स संघाने लिलावात सर्वाधिक बोली लावत घेतले होते. पण कोचीचा संघ बाद ठरल्यावर दिल्लीने केदारला आपल्या संघात स्थान दिले.
आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रजत भाटियाला (१.७ कोटी) राजस्थान रॉयल्सने घेतले, तर मनीष पांडेला (१.७ कोटी) कोलकाता नाइट रायडर्स संघाने घेतले. मुंबई इंडियन्सला यष्टीरक्षक आणि तडफदार फलंदाज आदित्य तरेला (१.६ कोटी) आपल्या संघात कायम ठेवण्यात यश आले. पण वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला (१.१० कोटी) संघात कायम ठेवणे मुंबईला जमले नाही, त्याला राजस्थान रॉयल्सने संघात घेतले.
मानधनाबाबत मी समाधानी आहे. या पेक्षाही जास्त मानधन मिळाले असते. तथापि, दिल्लीकडून पुन्हा खेळण्याची संधी मला मिळत आहे ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. यापूर्वी त्यांच्याकडून खेळलो असल्यामुळे त्यांच्याकडून खेळताना मला अडचणी येणार नाही. सहकारी खेळाडूंबरोबर माझे चांगले सुसंवाद असल्यामुळे या स्पर्धेत चांगले यश मिळविण्यासाठी हा समन्वय खूप उपयुक्त ठरणार आहे.
– केदार जाधव, दिल्ली डेअरडेव्हिल्स
पहिल्या बोलीनंतर चिंता नव्हती
माझ्यावर कोणीतरी बोली लावावी असे वाटत होते. माझ्यासाठी पहिली बोली लागली, त्यानंतर मला चिंता नव्हती. मला लिलावात किती रक्कम मिळेल याबद्दल मला काळजी नव्हती. सनरायझर्स हैदराबाद संघ माझ्यासाठीच्या बोलीत स्वारस्य दाखवील याची कल्पना होती, मात्र ३.७५ कोटी एवढय़ा रकमेला खरेदी करतील असे वाटले नव्हते. सर्वाधिक बोली माझ्यासाठी लागेल असे अजिबातच वाटले नव्हते.
करण शर्मा, सनरायझर्स हैदराबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan sharma biggest winner among uncapped players at ipl auction
First published on: 14-02-2014 at 04:08 IST