भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले. ज्यामध्ये करूण नायरचला डच्चू देत त्याच्या जागी साई सुदर्शनला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आलं. साईने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना अर्धशतक झळकावत चांगली कामगिरी केली. यादरम्यान करूण नायर आणि केएल राहुलचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करूण नायर रडताना दिसत आहे, तर राहुल त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सावरत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये करुण नायरला रडताना पाहून त्याचा बालपणीचा मित्र आणि टीम इंडियाचा सहकारी केएल राहुलने आधार दिला. कॅमेऱ्याने ही संपूर्ण घटना कैद केली.

करूण नायरचे हे व्हायरल फोटो पाहून त्याची क्रिकेट कारकिर्द संपली का अशा चर्चा सुरू आहेत. करूण नायर केएल राहुलबरोबर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा तर करत नाहीये ना अशाही कमेंट्स चाहते करत आहेत. करुण नायरला ८ वर्षांनी भारताच्या कसोटी संघात संधी मिळाली, पण तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. तो फारश्या धावा करू शकला नाही.

इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत करुण नायरला मोठी खेळी करण्यात अपयश आले. इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत करुण नायरने आतापर्यंत ६ डावांमध्ये ०, २०, ३१, २६, ४० आणि १४ धावा केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये करुण नायर खूप भावनिक आणि डोळ्यात अश्रू असल्याचे दिसत आहे. यादरम्यान करुण नायरचा बालपणीचा मित्र केएल राहुल त्याचे सांत्वन करताना दिसत आहे. पण करूण नायरचा हा फोटो मँचेस्टर नाही तर लॉर्ड्स कसोटीदरम्यानचा असल्याचं म्हटलं जात आहे. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात करुण नायर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, पण त्याचे पुनरागमन त्याच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात करुण नायर शून्यावर बाद झाला.

तर करूण दुसऱ्या डावात ५४ चेंडूत २० धावा काढून बाद झाला. बर्मिंगहममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात करुण नायरचा फलंदाजीचा क्रम बदलण्यात आला आणि त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले, परंतु तरीही परिस्थिती काही सुरळीत झाली नाही. बर्मिंगहम कसोटीच्या पहिल्या डावात करुण नायर ३१ धावांवर बाद झाला होता. दुसऱ्या डावात तो २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला लॉर्ड्सवर आणखी एक संधी दिली. तरीही तो काही खास कामगिरी करू शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात ४० धावा करत करुण नायर बाद झाला. तर दुसऱ्या डावात १४ धावा काढून बाद झाला. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातून करुण नायरला अखेर प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.