Karun Nair Won Hearts with Gestured IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत भारताने खराब सुरूवातीनंतर चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये करूण नायरने मोठी भूमिका बजावली. ओव्हल कसोटीत फलंदाजी करत असलेल्या टीम इंडियाने पहिल्या दिवशी ६ विकेट्स गमावत २०४ धावा केल्या आहेत. दरम्यान करूण नायरने अर्धशतक झळकावत सुंदरसह ५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पण पहिल्या दिवशी करूण आणि सुंदरच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या करूण नायरसमोर संघाचे एकामागून एक विकेट्स पडत होते. पण त्याने दुसरं टोक सांभाळून ठेवत धावा काढणं सुरूच ठेवलं. त्रिशतकवीर करूणने ९ वर्षांनंतर कसोटीत अर्धशतक झळकावलं. तर वॉशिंग्टन सुंदरनेही त्याला चांगली साथ देत त्याच्यासह अर्धशतकी भागीदारी रचली आहे. पण यापूर्वी मैदानात एक मोठा प्रसंग घडला.
ख्रिस वोक्सला सीमारेषेजवळ जबर दुखापत
जेमी ओव्हरटनच्या ५७व्या षटकात ख्रिस वोक्सला जबर दुखापत झाली. या षटकातील पाचव्या चेंडूवर करूण नायरने शानदार ड्राईव्ह खेचला आणि वोक्स सीमारेषेच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चेंडूचा पाठलाग करत होता. जसा वोक्स सीमारेषेजवल पोहोचला त्याने डाईव्ह मारून चेंडू वाचवण्याचा प्रयत्न केला. पण सीमारेषेच्या पलीकडे पडताना त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली.
वोक्स अक्षरश: वेदनेने कळवळत होता. कदाचित त्याचा खांदा सांध्यातून निखळला असल्याची शक्यता आहे. बराच वेळ वोक्स वेदनेने कळवळत होता. तितक्यात फिजिओ पोहोचले. पण वोक्स वेदनेने इतका विव्हळत होता की त्याने खांदा बिलकुल सोडला नाही. फिजिओने त्याच्या टीशर्टनेच त्याच्या हाताला आधार दिला आणि तो मैदानाबाहेर गेला.
करूण-सुंदरच्या कृतीने जिंकली साऱ्यांची मनं
वोक्सचा चेंडूचा पाठलाग करत असताना करूण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ३ धावा आधीच काढल्या होत्या. वोक्सने चेंडू अडवल्यानंतरही टीम इंडिया धावा काढू शकत होती, कारण इतर कोणताच फिल्डर सीमारेषेजवळ नव्हता. पण पडल्यानंतर वोक्सला दुखापत झालेली पाहता करूण नायरने चौथी धाव घेण्यास नकार दिला, सुंदरही धाव न घेताच थांबला. या दोघांनी दाखवलेली खेळभावना पाहून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
चाहत्यांनी सोशल मीडियावर या दोघांच्या कृतीवरून इंग्लंडला टोमणे मारले आहेत. याला खेळभावना म्हणतात, असंही चाहत्यांनी म्हटलं आहे. वोक्सला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत या दोघांच्या खेळभावनेचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.