महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
पदार्पणाच्या महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवले. केनियाच्या स्टीफन किपचिरचिर याने सुरुवातीपासूनच आघाडी घेत पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले. महिलांमध्ये शायलिन जेपकोरिर विजेती ठरली.
स्टीफन याने २ तास, १७ मिनिटे, ३९ सेकंद वेळ देत प्रथम क्रमांक पटकावला. केनियाच्या डॉमिनिक कँगोर याने २ तास, १९ मिनिटे, ३५ सेकंद अशी कामगिरी करत दुसरे स्थान प्राप्त केले. इथिओपियाच्या झिके देबेबे याला २ तास, २१ मिनिटे, ३५ सेकंदांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पहिल्यावहिल्या महाराष्ट्र पोलीस मॅरेथॉनमध्ये काही घटनांच्या बाबतीत स्पर्धकांनी आयोजनाविषयी नाराजी व्यक्त केली. अनेक स्पर्धकांना शर्यत संपल्यानंतर सहभाग पदकाविनाच घरी परतावे लागले. त्यांना कुरियरने पदके घरी पाठवली जातील, असे संयोजकांकडून सांगण्यात आले.
महिलांमध्ये शायलिन हिने आपल्याच देशाच्या ग्लॅडिय केम्बॉय हिला ५०मीटरच्या अंतराने मागे टाकत २ तास ४१ मिनिटे ५८ सेकंद अशा कामगिरीसह विजेतेपदाचा मान मिळवला. केम्बॉयला २.४२.०१ सेकंदासह दुसऱ्या तर महाराष्ट्राच्या ज्योती गवतेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. परभणीच्या ज्योतीने मात्र याच कामगिरीसह भारतीय महिलांच्या गटात पहिला येण्याचा मान मिळवला. तिने २ तास, ५४ मिनिटे, १६ सेकंद अशी वेळ नोंदवली. शाल्मली सिंगने २.५९.५६ सेकंदासह दुसरे तर रितू पालने ३.१५.४६ सेकंदासह तिसरे स्थान प्राप्त केले.
भारतीय पुरुषांमध्ये सेनादलाच्या राहुल पाल याने नवीन हूडा याला मागे टाकत २.२९.४४ सेकंद अशी कामगिरी करत पहिला क्रमांक मिळवला. नवीन हुडा याला एका सेकंदाच्या फरकाने (२.२९.४५ सेकंद) दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सुखदेव सिंग याने २.२९.५३ सेकंदांसह तिसऱ्या स्थानावर मजल मारली.
पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये राहुलचा धाकटा भाऊ अभिषेक पाल याने १.०५.२९ सेकंदांसह जेतेपद मिळवले. त्यानंतर रणजित पटेल आणि तीर्थ कुमार पून यांनी अनुक्रमे १.०५.३६ सेकंद आणि १.०६.०२ सेकंद अशी कामगिरी नोंदवत दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.
