भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने आगामी चीन ओपन सुपरसीरिज स्पर्धेतून माघार घेतली आहे. नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतच्या पायाला दुखापत झाल्याचं कळतंय. त्यामुळे श्रीकांतला डॉक्टरांनी एक आठवडा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चीन ओपन स्पर्धेनंतर होणाऱ्या हाँगकाँग सुपरसिरीज स्पर्धेत श्रीकांत सहभागी होणार आहे. श्रीकांतने पीटीआयला आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली. १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान चीन ओपन सुपरसिरीज स्पर्धा खेळवली जाणार आहे.

श्रीकांतच्या या दुखापतीवर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. “राष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताच्या आघाडीच्या खेळाडूंशी सल्लामसलत करुन तारखा ठरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेमुळे श्रीकांतला दुखापत झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही.” संघटनेचे सचिव अनुप नारंग यांनी आपली बाजू मांडली. राष्ट्रीय स्पर्धा ही बॅडमिंटन असोसिएशनची महत्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे भविष्यकाळातही खेळाडूंशी सल्लामसलत करुन या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल असं नारंग यांनी स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा – एच. एस. प्रणॉय नवीन विजेता, अंतिम फेरीत किदम्बी श्रीकांतवर केली मात

नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एच. एस. प्रणॉयने किदम्बी श्रीकांतवर अंतिम फेरीत मात केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार अंतिम सामन्यातही श्रीकांत आपली पायाची दुखापत घेऊन खेळला होता. त्यामुळे विश्रांतीनंतर पुनरागमन करुन हाँगकाँग ओपनमध्ये श्रीकांत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा – ‘फुलराणी’च्या नावावर तिसरं राष्ट्रीय विजेतेपद, अंतिम फेरीत पी. व्ही. सिंधूवर केली मात