किदम्बी श्रीकांत, भारताचा बॅडमिंटनपटू
सुप्रिया दाबके
सरावाला सुरुवात झाल्यावर पूर्णपणे तंदुरुस्ती राखण्याचा माझा पहिला प्रयत्न असेल. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणे सोपे नसेल. मात्र टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे माझे मुख्य ध्येय आहे, असे भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने सांगितले.
जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या २७ वर्षीय श्रीकांतला केंद्र सरकारने अर्जुन आणि पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवले आहे. नुकतीच भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून त्याची ‘खेलरत्न’ या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. त्यानिमित्ताने ‘रेड बुल’शी करारबद्ध असलेल्या श्रीकांतशी केलेली खास बातचीत –
* तुझी नुकतीच ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. त्याविषयी काय सांगशील?
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तो पटकावण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. माझी त्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आल्याने मला अभिमान वाटत आहे आणि तो मिळेल याची खात्री आहे.
* गेली दोन वर्षे तुझ्यासाठी अपयशी ठरली. मात्र वर्षांच्या पूर्वार्धात तुझ्याकडून चांगली कामगिरी झाली. टोक्यो ऑलिम्पिकसाठी कशी तयारी करत आहेस?
माझ्यासाठी गेली दोन वर्षे खडतर होती. त्यातच अधूनमधून दुखापतींचा फटकाही मला बसला. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरपासून मला चांगली लय सापडली. चांगली कामगिरी होत नसल्याने मोठय़ा प्रमाणात सरावावर भर दिला होता. तंदुरुस्ती राखण्याला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. टोक्यो ऑलिम्पिकबाबत सांगायचे तर ही स्पर्धा लांबणीवर पडल्याने मला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. माझे प्राधान्य टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याचे आहे. त्यासाठी जेव्हा स्पर्धाना सुरुवात होईल, तेव्हा ऑलिम्पिकला पात्र ठरण्याच्या दृष्टीने सर्वाधिक प्रयत्न करणार आहे. तंदुरुस्ती राखणेही सध्याच्या दिवसांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे. ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धा संपल्यानंतर नेहमी एक किंवा दोन महिन्यांची विश्रांती असते. त्या विश्रांतीचा उपयोगही ऑलिम्पिकसाठी सज्ज होण्याकरिता करणार आहे.
* २०१६ रिओ ऑलिम्पिकमधील अनुभवाचा उपयोग टोक्योमध्ये कशा प्रकारे होईल असे वाटते?
रिओ ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी झाली होती. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव खटकतो. त्या पराभवातून बोध घेऊन टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळ करण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या टाळेबंदीमुळे सराव करणे अवघड आहे. १ जुलैपासून हैदराबाद येथे राष्ट्रीय बॅडमिंटन शिबीर भरवण्याचा संघटनेकडून प्रयत्न होता. मात्र तेलंगणामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिबिराला परवानगी मिळाली नाही. १ ऑगस्टपासून राष्ट्रीय सराव शिबीर सुरू करण्यासंबंधीची चर्चा सुरू आहे. सराव शिबीर भरले तर पुन्हा बॅडमिंटनचा सराव जोमाने करता येईल. त्याच वेळेस सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन हंगामाबाबतही उत्सुकता आहे.
* सध्या करोनामुळे असलेल्या टाळेबंदीच्या काळात तंदुरुस्तीवर कशी मेहनत घेतोस?
गुंटुर येथील माझ्या शहरात जिम आणि मैदाने खुली नसल्याने घरातच मला असलेल्या उपलब्ध साधनांनी व्यायाम करावा लागत आहे. माझ्या घरात डंबेल्ससह काही व्यायामाची उपकरणे आहेत. त्यांनी दररोज दीड तास सराव करतो. गेली २० वर्षे मी सातत्याने बॅडमिंटन खेळत आहे. मात्र प्रथमच तीन महिने बॅडमिंटनपासून दूर राहिलो. अर्थातच पुनरागमन करणे, हे फारसे सोपे नाही. या स्थितीत जेव्हा हैदराबादला बॅडमिंटन सरावासाठी जाण्याची संधी मिळेल, तेव्हा १०० टक्के तंदुरुस्ती साधण्याचा माझा पहिला प्रयत्न असेल. घरात मी प्रथमच इतका जास्त काळ राहिलो आहे. त्यामुळे घरच्यांसोबत वेळ देता आल्याचेही जोडीला तितकेच समाधान आहे.