Kieron Pollard Sixes In CPL 2025: वेस्टइंडिजचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून काही वर्ष उलटली आहेत. मात्र, त्याच्या फलंदाजीची धार अजूनही कमी झालेली नाही. वयाच्या ३८ व्या वर्षीही तो गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत त्याच्या फलंदाजीचा दरारा पाहायला मिळत आहे. ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या पोलार्डने सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाविरूद्ध खेळताना ८ चेंडूत ७ षटकार खेचले. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कायरन पोलार्ड हा असा फलंदाज आहे, जो खेळपट्टीवर टिकून राहिला तर कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं.या सामन्यात फलंदाजी करताना त्याने सुरूवातीच्या १२ चेंडूत अवघ्या १३ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढे जे झालं, ते सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघातील गोलंदाजांना हादरवून टाकणारं होतं. पोलार्डने अचानक आक्रमक फलंकदाजी करायला सुरूवात केली. १२ चेंडूत १३ धावा करणाऱ्या पोलार्डने पुढील १६ चेंडूत ३३१.२५ च्या दमदार स्ट्राईक रेटने ५३ धावा कुटल्या.
या डावात फलंदाजी करताना त्याने २९ चेंडूंचा सामना करत ६५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार खेचले. यादरम्यान त्याने सुरूवातीच्या २ चेंडूंवर लागोपाठ २ षटकार खेचले. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव राहिला. तर पुढील ५ चेंडूंवर त्याने लागोपाठ ५ षटकार खेचले. हे सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघातील गोलंदाजांपेक्षा वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. या दमदार खेळीच्या बळावर, पिछाडीवर असलेल्या ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाने २० षटकात ६ गडी बाद १७९ धावा केल्या. ज्यात निकोलस पूरनच्या ३८ चेंडूत ५२ धावा, डॅरीन ब्राव्होच्या २१ आणि कॉलिन मुनरोच्या १७ धावांचा देखील समावेश होता. यादरम्यान पोलार्डने निकोलस पूरनसोबत मिळून चौथ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ९० धावांची भागीदारी देखील केली.
ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचा विजय
सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाकडून आंद्रे फ्लेचर आणि एविन लुईस यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९६ धावा जोडत दमदार सुरूवात करून दिली. फ्लेचरने ६७ तर लुईसने ४२ धावांची खेळी केली. दमदार सुरूवात मिळाल्यानंतर सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाला हवा तसा शेवट करता आला नाही. या सामन्यात सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाला २० षटकांअखेर ६ गडी बाद १६७ धावा करता आल्या.