Kieron Pollard Fastest Half Century In CPL 2025: मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. वयाच्या ३८ व्या वर्षीही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे. त्याने गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला. यासह स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं आहे.
कायरन पोलार्डचं सर्वात वेगवान अर्धशतक
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत कायरन पोलार्डचं रौद्ररूप पाहायला मिळालं आहे. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलार्डने गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाविरुद्ध झालेल्या अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. हे कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील त्याचं वैयक्तिक सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तर या स्पर्धेतील तिसरं सर्वात वेगवान अर्धशतक आहे. याआधी डेव्हिड मिलर आणि एविन लुईसने १७-१७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.
या धावा करताना त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने ५ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार मारले. यादरम्यान त्याने ३०० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
या स्पर्धेतील १३ वा सामना ट्रिनबागो नाईट रायडर्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कायरन पोलार्डची खेळी व्यर्थ गेली. या सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर ५ गडी बाद १६७ धावा केल्या. या संघाकडून कायरन पोलार्डने नाबाद ५४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने शेवटच्या षटकात ३ गडी राखून विजय मिळवला. ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने हा सामना जिंकून ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत. यासह गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर दुसरीकडे ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाने ९ पैकी ६ सामने जिंकून आधीच या स्पर्धेतील पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.