KL Rahul Angry on Umpire Video: ओव्हल कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सत्रात चांगली गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना फार वेळ मैदानावर टिकू दिलं नाही. मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि प्रसिध कृष्णाच्या त्रिकुटाने चांगली गोलंदाजी केली. पण तिसरे सत्र सुरू झाल्यानंतर पाऊस पडल्याने सामना थांबवण्यात आला आहे. सध्या इंग्लंडकडे १८ धावांची आघाडी आहे. दरम्यान राहुलचा पंचांशी वाद घालतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दुसऱ्या दिवशी इंग्लंडने भारताला २२४ धावांवर सर्वबाद केल्यानंतर वादळी फटकेबाजी झटपट धावा केल्या. इंग्लिश संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. आकाशदीपने डकेटला बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर इंग्लंडचे कोणतेच फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकले नाही. पण दुसऱ्या डावात रूट आणि प्रसिधच्या वादाने सर्वांचं लक्ष वेधलं.
केएल राहुलने पंचांशी का घातला वाद?
प्रसिधच्या २२ व्या षटकात जो रूट आणि त्याच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रसिध कृष्णाच्या कमालीच्या चेंडूवर जो रूट गडबडला आणि बाद होण्यापासून थोडक्यात वाचला. यानंतर प्रसिध त्याच्याजवळ जात त्याला काहीतरी बोलला. यावर रूट संतापला आणि त्याने देखील पुढे येत त्याला सुनावलं. यानंतर पुढच्या चेंडूवर रूटने चौकार मारला आणि पुढे येताना पुन्हा दोघांमध्ये वाद झाला, ज्यादरम्यान रूटने प्रसिधला शिव्या घातल्या.
प्रसिध आणि रूटच्या वादामध्ये पंच कुमार धर्मसेना यांना हस्तक्षेप केला. यानंतर ते प्रसिध कृष्णाला तू असं वागू शकत नाही, यावरून बोलताना दिसले. दरम्यान सर्व भारतीय खेळाडू तिथे जमले. तेदेखील पंचांशी बोलत होते. पंच आणि भारतीय खेळाडूंमधील बोलणं स्टम्प माईकवर रेकॉर्ड झालं. राहुल मात्र पंचांच्या बोलण्याशी सहमत नव्हता आणि त्याने पंचांना प्रत्युत्तर केलं.
राहुल आणि पंचाचं बोलणं स्टम्प माईक रेकॉर्ड झालं आहे, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय, यामध्ये दोघांमध्ये काय बोलणं झालं; ते खालीलप्रमाणे…
- राहुल – म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, आम्ही नक्की काय करावं, गप्प बसावं का?
- पंच – कोणताही गोलंदाज येऊन तुमच्याशी अशा पद्धतीने बोलेल तर चालेल का? तुम्ही असं नाही करू शकत.
- राहुल – मग आम्ही केलं पाहिजे? आम्ही गप्प खेळून घरी जाऊ का?
- पंच – सामना संपल्यावर आपण यावर चर्चा करू. तू असं माझ्याशी बोलू शकत नाहीस.
लंचब्रेकनंतर दुसऱ्या सत्रात भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करण्याच्या उद्देशाने उतरल्याचे सुरूवातीपासूनच दिसत होते. भारताने दुसऱ्या सत्रात अगदी तेचं केलं आणि कमालीची गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं.