KL Rahul, Kolkata Knight Riders: भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. आता केएल राहुल बाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार , केएल राहुल आयपीएल २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ सोडून कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत जोडला जाऊ शकतो.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्स संघाने केएल राहुलला आपल्या संघात स्थान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. त्याच्याआधी २०२४ मध्ये संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे होती.

अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाची ट्रॉफी जिंकली होती. मात्र या संघाने त्याला रिलीज केलं होतं. त्यामुळे श्रेयस अय्यरने पंजाब किंग्ज संघाची साथ धरली. या संघाला देखील त्याने अंतिम फेरीत पोहोचवलं होतं.

केएल राहुल कर्णधारपद मिळणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या हंगामात झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरला रिलीज करून वेंकटेश अय्यरला २३.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. मात्र कोलकाता नाईट रायडर्सचा हा डाव पूर्णपणे फसला होता. तर लखनऊची साथ सोडलेल्या केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. आगामी हंगामासाठी होणाऱ्या लिलावात जर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ त्याला २५ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान देऊ शकतो. यासह त्याला कर्णधारपद देखील दिले जाऊ शकते. केएल राहुलने गेल्या हंगामात फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली होती. दिल्लीकडून खेळताना त्याने ५०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. यादरम्यान संघाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा त्याने अनेकदा महत्त्वपूर्ण खेळी केली होती.