Kranti Gaud’s Father Suspension Restore: भारताच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर अनेक यशोगाथा समोर आल्या. यात आता २२ वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडच्या यशोगाथेची भर पडली आहे. क्रांती गौडच्या गोलंदाजीमुळे भारताचा विजय तर झालाच, तसेच तिच्या वडिलांनी गमावलेला सन्मानही पुन्हा मिळवण्यास मदत झाली. क्रांतीच्या वडिलांनी पोलीस दलातील नोकरी गमावल्यानंतर १३ वर्षांपासून सुरू असलेला कुंटुंबाच्या संघर्षाचाही अंत झाला. क्रांती गौडच्या वडिलांना पुन्हा एकदा सन्मानपूर्वक त्यांची नोकरी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
क्रांती गौडचे वडील मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना २०१२ साली चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्यात आले. काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने वडिलांचा गौरव परत मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. शुक्रवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते क्रांती गौडचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वडिलांना पुन्हा नोकरीवर घेण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
भोपाळमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री यादव म्हणाले, “संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी क्रांतीने केली आहे. तिच्या कुटुंबाच्या अडचणींबद्दल मला माहिती मिळाली आहे. राज्य सरकार सध्याच्या नियमानुसार तिच्या वडिलांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.” मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
२०१२ साली पोलीस दलातून निलंबित
क्रांतीचे वडील मुन्ना सिंह यादव यांना २०१२ साली पोलीस दलातून काढण्यात आले. त्यानंतर क्रांतीच्या कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एक काळ असा होता जेव्हा दिवसाचे एकावेळचे अन्न मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता, अशी दुःखद आठवण क्रांती गौडने सांगितली. मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर तिच्यासह कुटुंबियांनाही चांगले दिवस आले.
क्रांती गौडने सांगितले की, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिच्या भावाला रोजंदारीवर काम करावे लागले. तसेच त्याने बस कंडक्टर म्हणूनही काम केले. क्रांती गौडच्या कामगिरीमुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी क्रांती गौडच्या सन्मानार्थ १५ नोव्हेंबर रोजी जबलपूरमध्ये बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी अभिमान दिन साजरा करण्याचे आश्वासन दिले. तसेच छतरपूरमध्ये नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्याचीही घोषणा केली.

विश्वचषकातील कामगिरी
क्रांती गौडने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ८ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने तिची सर्वोच्च कामगिरी केली. या सामन्यात तिने २० धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.
सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळत असताना क्रांती गौडने महत्त्वाची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला आणखी मोठी धावसंख्या रचण्यापासून काहीप्रमाणात रोखले होते. शतकवीर ॲलिसा हिलीला बाद करून गौडने मोठी कामगिरी केली.
