ला लीगा फुटबॉल : रेयालची अल्मेरियावर मात

लुकास वाझकेझने पहिल्या सत्राच्या अखेरच्या क्षणांत गोल केला, पण तो ‘ऑफसाइड’ असल्याने पंचांनी गोल ग्राह्य धरला नाही.

ला लीगा फुटबॉल : रेयालची अल्मेरियावर मात
डेव्हिड अलाबा

माद्रिद : बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या डेव्हिड अलाबाने (७५ व्या मिनिटाला) केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर गतविजेत्या रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉलमधील पहिल्याच लढतीत अल्मेरिया संघावर २-१ असा विजय मिळवला. 

या सामन्यात माद्रिदची सुरुवात चांगली झाली नाही. लार्जी रमाझानीने सहाव्या मिनिटालाच गोल करत अल्मेरियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बरोबरी साधण्यासाठी माद्रिदच्या खेळाडूंचे प्रयत्न सुरू झाले. लुकास वाझकेझने पहिल्या सत्राच्या अखेरच्या क्षणांत गोल केला, पण तो ‘ऑफसाइड’ असल्याने पंचांनी गोल ग्राह्य धरला नाही. मध्यंतरापर्यंत अल्मेरियाकडे १-० अशी आघाडी होती.

उत्तरार्धात माद्रिदच्या संघाने अधिक आक्रमक शैलीत खेळ केला. वाझकेझने (६१व्या मि.) कर्णधार करीम बेन्झिमाच्या साहाय्याने माद्रिदला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर अलाबा मैदानात उतरताच माद्रिदला फ्री-किकची संधी मिळाली. या संधीचे गोलमध्ये रूपांतरण करत अलाबाने माद्रिदला २-१ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अल्मेरियाला पुनरागमन करता आले नाही.

अन्य लढतीत, व्हेलंसियाने जिरोनाचा १-० असा पराभव केला. त्यांच्याकडून कार्लोस सोलेरने गोल झळकावला. तसेच रेयाल सोलसिदादने कॅडिझला १-० अशाच फरकाने नमवले. सोलसिदादकडून टाकेफूसा कुबोने गोलची नोंद केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: La liga 2022 23 real madrid beat almeria zws

Next Story
निवडणूक यादी स्पष्ट झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा निर्णय ; माजी फुटबॉलपटू बायच्युंग भुतियाची भूमिका 
फोटो गॅलरी