इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदी सध्या सार्डिनियामध्ये आहेत. ललित मोदी २०१० मध्ये कर न भरल्यामुळे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीदरम्यान भारताबाहेर निघून गेले. त्यानंतर ते परदेशात राहत आहेत. २०१३ मध्ये भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर आयुष्यभरासाठी बंदी घातली.
अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी यांनी खुलासा केला की, त्यांनी सुरुवातीपासूनच फारसे नियम कधी पाळलेच नाहीत. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लार्कच्या बियॉन्ड 23 क्रिकेट पॉडकास्टमध्ये ललित मोदींची मुलाखत घेतली. यामध्ये मोदींनी आयपीएल, त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली.
“मी डायमंडचा चमचा घेऊन जन्माला आलो…”, ललित मोदी पाहा काय म्हणाला?
ललित मोदींनी त्यांच्या शालेय शिक्षणाबाबत सांगितलं की, “माझा श्रीमंत घरात जन्म झाला होता, अगदी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात ना तसं. पण मी सोन्याचा नाही तर डायमंडचा चमचा घेऊन जन्माला आलो होतो. मला जे हवं ते लहानपणापासून मिळालं. मी ५ वर्षांचा असताना मला बोर्डिंग शाळेत घातलं, तो प्रवास खडतर होता. मी ७ वेगवेगळ्या बोर्डिंग शाळेत गेलो आहे. माझे आजोबा, वडिल फार कडक शिस्तीचे होते. माझं संगोपन अतिशय कडक शिस्तीत झालं.”
क्रिकेटबद्दल बोलताना मोदी म्हणाले, “मी शिमलामधील बिशप कॉटन स्कूलमध्ये होतो. क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकी टीमसाठी छान लंच-डिनरची मेजवानी असायची. बोर्डिंग स्कूलमध्ये असताना नेहमी जरा जास्त खायला मिळावं असं वाटायचं. जर तुम्ही क्रिकेट संघाचा भाग असाल तर त्यांच्याबरोबर खायला मिळायचं. त्यामुळे मी सात-आठ वर्षांचा असतानाच स्कोअरबोर्डवर काम करण्यासाठी स्वेच्छेने तयार झालो. क्रिकेटच्या स्कोअरबोर्डवर आकडे बदलायचे, ते चाकं वर-खाली करायची, उंचावर चढून दिवसभर बसायचं, फक्त चांगलं जेवण मिळावं म्हणून हे सर्व करायचं.”
ललित मोदीने अमेरिकेत ‘या’ परीक्षेत पास होण्यासाठी केलेली
ललित मोदी यांनी मोठा खुलासा करताना सांगितलं, की अमेरिकेत कॉलेज प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या SAT (Scholastic Assessment Test) परीक्षेसाठी त्यांनी स्वतः बसण्याऐवजी दुसऱ्या कोणालातरी पैसे देऊन ती परीक्षा द्यायला लावली होती.
ललित मोदी म्हणाले, “मी घरातला एक बंडखोर मुलगा होतो आणि प्रत्येक नियम मी मोडायचो, कारण मला नेहमी आणखी सातत्याने गोष्टी मिळाव्या असं वाटायचं. मी सात वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकलो. शेवटी दिल्लीत आल्यावर बारावीच्या परिक्षेत नापास झालो. पण मी गोंधळ घालून कसंतरी सगळं निभावून नेलं कारण मला अमेरिकेला जायचं होतं. मला तिथे जाऊन पार्टी करायची होती, कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता आणि मला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. माझ्याजागी मी दुसऱ्या कोणालातरी SAT परीक्षा देण्यासाठी पाठवलं होतं. माझ्या नावावर त्याचा फोटो होता. मला १६०० पैकी १५६० गुण मिळाले. त्या काळात आम्ही निभावून नेलं, पण आजच्या काळात ते शक्य नाही.”
“कॉलेजसाठी मी नॉर्थ कॅरोलिनामधल्या ड्युक युनिव्हर्सिटीत गेलो. तिथे भारतीय फार कमी होते. मी कधीही देशाबाहेर राहिलो नव्हतो. मात्र बोर्डिंग स्कूलमध्ये असल्यामुळे लहानपणापासूनच मला सगळ्याची सवय होती, स्वतःची काळजी घ्यायला जमत होतं. पण तुम्ही भारतातून थेट पूर्ण विकसित जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेत प्रवेश करता, हा मोठा फरक होता,” ललित मोदी असं पुढे म्हणाले.