रंगना हेराथ (५६ धावांत ४ बळी) आणि मिलिंदा श्रीवर्धना (२५ धावांत ३ बळी)या दोघांच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर ७२ धावांनी विजय मिळवला आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असे निभ्रेळ यश मिळवले. विजयासाठी २४४ धावांचे लक्ष्य स्वीकारणाऱ्या विंडीजने १ बाद २० या धावसंख्येवर आपला दुसरा डाव पुढे सुरू केला. परंतु उपाहारानंतरच्या सत्रात विंडीजचा डाव फक्त१७१ धावांत कोसळला. विंडीजकडून डॅरेन ब्राव्होने (६१) एकाकी झुंज दिली. या मालिकेत १५ बळी घेणाऱ्या हेराथला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला, तर श्रीवर्धनाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.