राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) गेल्या दोन वर्षांत घेतलेल्या राष्ट्रीय उत्तेजक चाचणीत अडीचशेपेक्षा जास्त खेळाडू दोषी आढळले असल्याचे लोकसभेत सांगण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. लोकसभेत प्रश्नास उत्तर देताना जितेंद्र सिंग म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांमध्ये देशात २७९ खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंगच्या खेळाडूंचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्र उत्तेजकविरहित करण्यासाठी ‘नाडा’ संस्थेमार्फत कसोशीने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना कोणती औषधे उत्तेजकाच्या यादीत आहेत याची माहिती देण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. क्रीडा क्षेत्रात चांगले वातावरण तयार करण्याचे आमचे ध्येय आहे. जे खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत अशा खेळाडूंवर कडक कारवाई केली जात आहे.’’ ‘‘नाडातर्फे गेल्या तीन वर्षांमध्ये जवळपास दहा हजार उत्तेजक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. वेगवेगळे परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने आदी कार्यक्रमाद्वारे उत्तेजक सेवनाच्या दुष्परिणामांचीही माहिती खेळाडू व प्रशिक्षकांना दिली जात आहे’’ असे जितेंद्र सिंग यांनी सांगितले.