ऑस्ट्रेलिया संघात स्टार्कचा समावेश; जॉन्सनला विश्रांती
सिडनी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित तीन एकदिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना संघात स्थान देण्यात आले असून मिचेल जॉन्सनला विश्रांती देण्यात आली आहे. संघ : जॉर्ज बेली (कर्णधार), नॅथन कल्टर निले, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, आरोन फिंच, जोश हॅझेलवुड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टिव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू व्ॉड, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन.
मोहम्मद आमिर स्थानिक सामन्यांमध्ये खेळणार
कराची : सट्टेबाजीच्या आरोपाखाली बंदी घातलेल्या गोलंदाज मोहम्मद आमिरने सध्याच्या अभिनय क्षेत्राच्या कारकिर्दीकडून पुन्हा स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आमिर याच्यावरील बंदी उठविण्याची विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) केली आहे. त्यामुळेच आमिरने स्थानिक स्पर्धामध्ये भाग घेण्याचे ठरविले आहे. आमिरवर २०१० मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर त्याने अर्थार्जनासाठी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आमिरने आतापर्यंत चौदा कसोटी सामन्यांमध्ये ५० बळी मिळवले आहेत.
टॉम लॅथमचे शतक
दुबई : टॉम लॅथमच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बाद २४३ अशी मजल मारली आहे. लॅथम-ब्रेंडन मॅक्क्युलम जोडीने ७७ धावांची सलामी दिली. मॅक्क्युलम ४३ धावा करून बाद झाला. केन विल्यमसनने ३२ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलाय असे वाटत असतानाच रॉस टेलर २३ धावांवर बाद झाला. एहसान अदिलच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत लॅथमने या मालिकेतील दुसरे शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लॅथम १३७ तर कोरे अँडरसन ७ धावांवर खेळत आहेत.
हॉकी : बीपीसीएलला जेतेपद
मुंबई : मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेड आयोजित ४९व्या अखिल भारतीय बॉम्बे गोल्ड चषक हॉकी स्पर्धेत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) संघाने इंडियन ऑइल संघावर मात करत जेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआउटद्वारे झालेल्या निकालामध्ये बीपीसीएलने इंडियन ऑइलवर १०-९ असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत सामना ५-५ असा बरोबरीत संपला होता. टायब्रेकरमध्येही बरोबरीची कोंडी सुटली नाही आणि ८-८ अशी बरोबरी झाली. पेनल्टी शूटआउटमध्ये स्विंदर सिंगने अभेद्य बचाव करत तीन गोल वाचवले. बीपीसीएलच्या बीरेंद्र लाक्राला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. एअर इंडियाचा अॅड्रियन डिसुझा सर्वोत्तम गोलरक्षक ठरला. इंडियन ऑइलच्या गुरजिंदर सिंगने सर्वोत्तम बचावपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले. बीपीसीएलचा मनप्रीत सिंग सवरेत्कृष्ट मध्यरक्षक ठरला. बीपीसीएलचाच तुषार खांडेकरने सर्वोत्तम आघाडीपटू किताबाचा मानकरी ठरला.
स्क्वॉश : हरिंदरपालला सुवर्ण
मुंबई : हरिंदरपाल सिंग संधूने फुकेट येथे झालेल्या चौथ्या आशियाई बीच क्रीडा स्पर्धेत जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत हरिंदरपालने हाँगकाँगच्या लिऊ त्सझ फुंगवर ७-२, ५-७, ७-३, अशी मात केली. भारताने या स्पर्धेत या सुवर्णपदकासह दोन कांस्यपदके पटकावली.
फुटबॉल : मुंबई एफसीची आगेकूच
मुंबई : मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीगतर्फे आयोजित एलिट डिव्हिडनच्या लढतीत मुंबई एफसीने नौदलावर २-१ असा विजय मिळवला. मुंबई एफसीतर्फे काली अल्लादीन आणि जोसिमार डा सिल्व्हाने प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतीत एअर इंडियाने कर्नाटक स्र्पोटिंग असोसिएशन संघावर ५-२ अशी मात केली. अश्कर. सी.व्ही, प्रवीण शर्मा, रायन के., विजिथ शेट्टी आणि सागर चिले यांनी प्रत्येकी एक गोल केला. सुपर डिव्हिजनच्या लढतीत बँक ऑफ इंडियाने मध्य रेल्वेचा १-० असा पराभव केला. राहुल नायरने बँक ऑफ इंडियातर्फे एकमेव गोल केला.
क्रिकेट : एल अॅण्ड टी, इंडसइण्ड उपांत्य फेरीत
मुंबई : कॅपिटल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत लार्सन अॅण्ड टुब्रो, इंडसइण्ड बँक संघांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली. एल अॅण्ड टीने ११८ धावा केल्या. व्होडाफोनचा डाव ९९ धावांतच आटोपला. ४४ धावांसह २ बळी घेणाऱ्या राहुल जोशीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. इंडसइण्ड बँकेने १४२ धावांची मजल मारली. मटेरियल ऑर्गनायझेशन नौदलाला १२८ धावाच करता आल्या. ३३ धावा आणि २ बळी घेणाऱ्या योगेश दळवी सामनावीर ठरला. मिलन धामणकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डी डेकोरने आरपीसीए संघावर मात केली. राज्य सहकारी बँकेने दिलेले ६५ धावांचे लक्ष्य ग्लोब ऑप ग्रुपने ४ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले.
भारतीय शरीरसौष्ठव संघ फुकेटला रवाना
मुंबई : थायलंडमधील फुकेट शहरात चालू असलेल्या चौथ्या आशियाई समुद्रकिनारी क्रीडा स्पध्रेत १७ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत सहा गटांमध्ये होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पध्रेसाठी भारताचा संघ सोमवारी रवाना झाला आहे. या संघात रवी कुमार, सोमराज (पंजाब), अमित चौधरी (उत्तर प्रदेश), कोंतांदनर्नन मणीवेंदीनन् यांचा समावेश करण्यात आला आहे. संघटनेचे उपाध्यक्ष एम. आरसू व्यवस्थापक असतील, तर अभिजीत कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी असतील, अशी माहिती भारतीय शरीरसौष्ठव आणि तंदुरुस्ती महासंघाचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांनी दिली.
नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध अॅटेलटिकोला विजयाच्या आशा
पीटीआय, कोलकाता
साखळी गटांत आघाडीवर असूनही अॅटेलटिको कोलकाता संघ इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये मंगळवारी होणाऱ्या नॉर्थईस्ट युनायटेड संघाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी उत्सुक झाला आहे.
अॅटेलटिको संघाला गेल्या चार सामन्यांमध्ये विजय मिळविता आलेला नाही. त्यातच त्यांना पुणे सिटी संघाकडून १-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे खेळाडूंना उद्याच्या लढतीत खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांचा बचावरक्षक केविन लोबो हा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत अॅटेलटिको संघाची मदार प्रामुख्याने फिक्रू टेफेरा याच्यावर आहे. सरावाला अनुपस्थित राहिल्यामुळे मध्यरक्षक महोम्मद रफीकला संघाबाहेर जावे लागले आहे.