नवी दिल्ली : भारतीय कुस्तीला नवसंजीवनी देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक जॉर्जियाचे व्लादिमिर मेस्त्विरिश्विली यांचे सोमवारी वार्धक्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.

मेस्त्विरिश्विली यांनी आपली उभी हयात भारतीय कुस्तीच्या प्रगती आणि वाढीसाठी घालवली. खेळाडूपेक्षा प्रशिक्षक म्हणून मेस्त्विरिश्विली यांची कारकीर्द अधिक यशस्वी होती. जॉर्जियाचे मेस्त्विरिश्विली हे १९८२ ते १९९२ या कालावधीत जॉर्जियाचे प्रशिक्षक होते. या कालावधीत त्यांनी युरोपियन, ऑलिम्पिक आणि जागतिक विजेते मल्ल घडवले. त्यानंतर २००३ मध्ये ते भारतात आले आणि भारताचेच होऊन राहिले.

भारतीय कुस्तीला मातीतून मॅटवर यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सुशील कुमार, योगेश्वर दत्त, बजरंग पुनिया, रवी दहिया असे सर्व भारतीय आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदक विजेते त्यांनीच घडविले. भारतीय कुस्तीपटूंच्या कारकीर्दीला आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

भारतात प्रशिक्षक म्हणून काम करताना सुरुवातीला हरियाणा आणि नंतर नवी दिल्लीत छत्रसाल आखाड्यात त्यांनी काम पाहिले. कुस्ती शिकविण्याच्या अलौकिक तंत्रामुळे ते मल्लांमध्ये लोकप्रिय होते. मॅटच्या बाहेरही त्यांचा भारतीय मल्लांशी चांगली सुसंवाद होता. त्यामुळेच ते भारतीय कुस्ती क्षेत्रात ‘लाडो’ म्हणून परिचित झाले. त्यांच्या शैलीने प्रभावित होऊन भारताची महिला कुस्तीगीर दिव्या कांक्रन हिनेही सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रियो ऑलिम्पिकनंतर भारतीय कुस्तीगीर महासंघाने त्यांच्याशी असलेला करार संपुष्टात आणल्यावर सुशील कुमारने २०१७ मध्ये मेस्तिरिश्विली यांना नवी दिल्लीत छत्रसाल आखाड्यात मार्गदर्शनासाठी परत आणले. भारतीय प्रशिक्षकांना जे जमले नाही, ते मेस्त्विरिश्विली यांनी करून दाखवले. केवळ कुस्तीगीर नाही, तर त्यांच्याकडून भारतीय प्रशिक्षकांनीही धडे गिरविले. त्यांच्या जाण्याने केवळ भारताचेच नाही, तर अवघ्या कुस्ती विश्वाचे नुकसान झाले असल्याची भावना बजरंग पुनियाने व्यक्त केली.