Yashasvi Jaiswal Wicket: मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. या जोडीने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९४ धावा जोडल्या. दरम्यान केएल राहुलचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. तर यशस्वी जैस्वालने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याला ८ वर्षांनंतर कमबॅक करत असेलेल्या लियाम डॉसनने बाद करत माघारी धाडलं आहे.
केएल राहुलचं अर्धशतक थोडक्यात हुकलं
इंग्लंडमध्ये यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली आहे. दोघांनी मिळून या मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. मँचेस्टरमध्ये फलंदाजी करताना या दोघांकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पहिल्या सत्रात दोघेही नाबाद राहिले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात केएल राहुल बाद होऊन मााघारी परतला. केएल राहुलने ९८ चेंडूंचा सामना करत ४६ धावांची खेळी केली. त्याला ख्रिस वोक्सने झॅक क्रॉलीच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर यशस्वी जैस्वालने साई सुदर्शनसोबत मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
डॉसनच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वाल असा झाला बाद
तर झाले असे की, यशस्वी जैस्वाल ५८ धावांवर फलंदाजी करत असताना इंग्लंडकडून लियाम डॉसन गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने ओव्हर द विकेटचा मारा करताना सरळ टाकला. यशस्वीने हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केल. पण चेंडू बॅटची कडा घेत स्लिपमध्ये असलेल्या हॅरी ब्रुकच्या हातात गेला. हॅरी ब्रुकने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. यासह यशस्वी ५८ धावा करत माघारी परतला. यशस्वीच्या या खेळीमुळे भारतीय संघाने भक्कम सुरूवात केली होती.
डॉसनचं ८ वर्षांनंतर पुनरागमन
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी डॉसनला संघात स्थान देण्यात आलं आहे. तो २०१७ मध्ये शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले होते. यासह त्याला इंग्लंडकडून ६ वनडे आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हॅम्पशायर संघाचं प्रतिनिधित्व करतो. या संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २१२ सामन्यांमध्ये ३७१ गडी बाद केले आहेत. गोलंदाजीसह त्याने फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं आहे.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने १०००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.