पॅरिस : नेयमारने केलेल्या दोन गोलच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेन संघाने लीग-१ फुटबॉलच्या सामन्यात बोडरेवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या सेंट-जर्मेनचा हा १३ लढतींमधील ११वा विजय ठरला.

बोडरेच्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात सेंट-जर्मेनने चांगली सुरुवात केली. पूर्वार्धात नेयमारने (२६ आणि ४३वे मिनिट) दोन गोल करत संघाला मध्यंतराला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ६६व्या मिनिटाला किलियान एम्बापेने (६३वे मि.) आणखी एका गोलची भर घातली.

यानंतर बोडरेने दमदार पुनरागमन केले. बोडरेच्या अल्बेर्थ एलिस (७८वे मि.) आणि एम्बाये नियांग (९०+२वे मि.) यांनी गोल करत सामन्यात रंगत आणली. मात्र, सेंट-जर्मेनने त्यांना तिसरा गोल करण्यापासून रोखत विजयाची नोंद केली. अनुभवी आक्रमणपटू लिओनेल मेसी दुखापतीमुळे या लढतीत खेळू शकला नाही. मात्र नेयमार-एम्बापे यांच्या तारांकित जोडीने त्याची उणीव भासू दिली नाही.

मँचेस्टर सिटीची युनायटेडवर मात

मँचेस्टर : मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडवर २-० अशी मात केली. सातव्या मिनिटाला युनायटेडचा बचावपटू एरीक बायीने केलेल्या स्वयं गोलमुळे सिटीला १-० अशी आघाडी मिळाली, तर ४५ व्या मिनिटाला बर्नाडरे सिल्वाने सिटीचा दुसरा गोल केला. सिटीचा हा ११ सामन्यांत सातवा विजय ठरला, तर युनायटेडचा ११ सामन्यांत चौथा पराभव होता. तसेच गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेल्सीला बर्नलीने १-१ असे बरोबरीत रोखले.

लेवांडोवस्कीमुळे बायर्नची सरशी

बायर्न : आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीच्या गोलमुळे बायर्न म्युनिकने बुंडेसलिगा फुटबॉलच्या सामन्यात एससी फ्रायबर्गवर २-१ अशी सरशी साधली. लिऑन गोरित्झकाने ३०व्या मिनिटाला गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली, तर ७५व्या मिनिटाला लेवांडोवस्कीने ही आघाडी दुप्पट केली. अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना फ्रायबर्गच्या यानिक हाबेर्रर गोल केला, पण बायर्नने एक गोलच्या फरकाने हा सामना जिंकत हंगामातील नववा विजय मिळवला.