वर्षांतील शेवटचा कसोटी सामना असो किंवा पहिला आम्ही आमच्यासारखेच खेळणार, हे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही दाखवून दिले. फलंदाजांसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण या गोष्टींचा पुरेपूर फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी उचलत पुन्हा एकदा धुमशान घातले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे तडाखेबंद शतक, ख्रिस रॉजर्सची सलग पाचवी  अर्धशतकी खेळी आणि शेन वॉटसन आणि कर्णधार स्टिव्हन स्मिथ यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर २ बाद ३४८ अशी दमदार मजल मारली आहे.
फलंदाजांना मदतशीर खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजांनी त्याचा चांगलाच फायदा उचलला. ऑस्ट्रेलियाने सावधपणे डावाची सुरुवात केली. रॉजर्स १६ धावांवर असताना त्याचा सोपा झेल दुसऱ्या स्लिपमध्ये के. एल.  राहुलने सोडला आणि भारताने मोठी संधी गमावली. या संधीचा पुरेपूर फायदा रॉजर्सने उचलला. एकीकडून वॉर्नर भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत असताना रॉजर्स शांतपणे एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घालत होता. या दोघांनी २०० धावांची सलामी देत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. शतक झळकावल्यावर वॉर्नरने हवेत जोरात उडी मारत आनंद साजरा केला, पण त्यानंतर आपल्या लाडक्या फिल ह्य़ूज या मित्राची आठवण काढायला तो विसरला नाही. सहा आठवडय़ांपूर्वी ह्य़ूजला या मैदानातच जीवघेणा चेंडू लागला होता.
शतक झळकावल्यावर वॉर्नर जास्त काळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. अश्विनने वॉर्नरचा काटा काढत भारताला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नरने तुफानी फलंदाजी करताना १६ चौकारांच्या जोरावर १०१ धावांची खेळी साकारली. वॉर्नर बाद झाल्यावर रॉजर्सही अवघ्या चार धावांमध्ये तंबूत परतला. गेल्या चार डावांमध्ये अर्धशतक झळकावल्यावर रॉजर्सला शतक पूर्ण करण्याची नामी संधी होती, पण रॉजर्सचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. रॉजर्सने १३ चौकारांच्या जोरावर ९५ धावा फटकावल्या.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर वॉटसन आणि स्मिथ या दोघांनी पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. या दोघांनी ४४.१ षटकांमध्ये १४४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. स्मिथने १० चौकारांच्या जोरावर नाबाद ८२, तर वॉटसनने ६ चौकारांच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली. उमेश यादवच्या अखेरच्या षटकात पहिल्या स्लिपमध्ये आर. अश्विनने वॉटसनला जीवदान दिले.
भारताचा नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात भारतीय संघात घाऊक बदल केले. त्याने शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा या फलंदाजांना वगळले, तर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांना संधी दिली, त्याचबरोबर संघात सुरेश रैनाला पुनरागमनाची संधी दिली. इशांत शर्माला वगळून या वेळी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली. पहिला दिवशी भारतीय गोलंदाजांना चांगलाच मार पडला असला तरी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होते का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स त्रि. गो. शमी ९५, डेव्हिड वॉर्नर झे. विजय गो. अश्विन १०१, शेन वॉटसन खेळत आहे ६१, स्टिव्हन स्मिथ खेळत आहे ८२, अवांतर (लेग बाइज ३, वाइड ६) ९, एकूण ९० षटकांत २ बाद ३४८.
बाद क्रम : १-२००, २-२०४.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार २०-२-६७-०, उमेश यादव १६-१-९७-०, मोहम्मद शमी १६-२-५८-१, आर. अश्विन २८-५-८८-१, सुरेश रैना १०-२-३५-०.

सिडनीची फलंदाजांना साहाय्यकारी खेळपट्टी आणि भारताचे सुमार क्षेत्ररक्षण याचा फायदा झाला. चेंडू स्विंग होत नव्हता. खेळपट्टीची गोलंदाजांसाठी मदत नसल्याने धावा रोखणे आणि विकेट्स मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर भारताला अपयश आले. नाणेफेक जिंकणे आमच्या पथ्यावर पडले. शतक झळकावणे आणि रॉजर्ससह दोनशे धावांची सलामी समाधान देणारे आहे. ह्य़ुजच्या कुटुंबीयांना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी सहन केलेले दु:ख शब्दातीत आहे, त्यातून सावरत ते सिडनीच्या मैदानावर उपस्थित राहिले. त्यांच्या धैर्याला माझा सलाम.
– डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर

स्कोअरकार्ड-

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score india vs australia 4th test day
First published on: 07-01-2015 at 12:13 IST