मनिष पांडेच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धचा सामना ४ विकेट्सने जिंकला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मनिष पांडेने मैदानात टिच्चून फलंदाजी करत संघासाठी विजय खेचून आणला. अखेरच्या षटकात कोलकाताला विजयासाठी ९ धावांची गरज होती. अमित मिश्राने पहिला चेंडू निर्धाव, तर दुसऱया चेंडूवर ख्रिस वोक्सची विकेट घेतली. त्यानंतर सुनील नरेनने एक धाव काढून मनिष पांडेला स्ट्राईक दिली. मनिष पांडेने खणखणी षटकार खेचून सामना २ चेंडूत २ धावा असा आणला. पुढच्या चेंडूवर कव्हर्समध्ये दोन धावा काढून मनिष पांडेने संघासाठी मॅच विनिंग खेळी साकारली.
दिल्लीच्या १६९ धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात कोलकाताची सुरूवात निराशाजनक झाली होती. २१ धावांवर कोलकाताचे तीन फलंदाज तंबूत दाखल झाले होते. युसूफ पठाण आणि मनिष पांडे यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पठाणने ३९ चेंडूत ५९ धावा ठोकल्या. यात दोन षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. पठाण बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने इतर फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. पण मनिष पांडेने दुसरी बाजू लावून धरली आणि सामना अखेरच्या षटकपर्यंत खेचला.
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांमध्ये १६९ धावांंचे आव्हान ठेवले होते . दिल्लीकडून यावेळी ऋषभ पंतने अखेरच्या षटकांमध्ये चांगली फटकेबाजी केली. पंतने ४ षटकार आणि २ चौकार लगावत १६ चेंडूत ३८ धावांची खेळी केली.
सलामीवीर संजू सॅमसन आणि बिलिंग्ज यांनीही चांगली सुरूवात केली होती. सॅमसनने ३९ धावांची खेळी केली. यात सात खणखणीत चौकारांचा समावेश होता. तर बिलिंग्जने २१ धावा ठोकल्या. करुण नायर यावेळी धावांसाठी झगडताना दिसला. नायरने २७ चेंडूत २१ धावा केल्या. कुल्टर नायलच्या गोलंदाजीवर तो क्लीनबोल्ड झाला. ख्रिस मॉरिसनेही अखेरच्या दोन षटकांमध्ये तीन चौकार लगावत ९ चेंडूत नाबाद १६ धावांची खेळी साकारली.