मँचेस्टर युनायटेड आणि आर्सेनल या संघांविरुद्ध सलग दोन पराभव पत्करणाऱ्या लिव्हरपूल संघाने मंगळवारी इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) लढतीत न्यूकॅसल युनायटेडचा २-० असा पराभव करून जेतेपदाच्या शर्यतीत मुसंडी मारली. रहिम स्टर्लिग आणि जोए अ‍ॅलन यांच्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर लिव्हरपूलने ५७ गुणांसह पाचव्या स्थानावर झेप घेतली. चौथ्या स्थानावर विराजमान असलेल्या मँचेस्टर सिटी संघापासून ते ४ गुणांनी पिछाडीवर आहेत. अद्याप त्यांच्या सहा लढती शिल्लक आहेत.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच लिव्हरपूलने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला आणि ९व्या मिनिटाला त्यांचे गोलचे खाते उघडले. रहिम स्टर्लिगने न्यूकॅसलची बचावफळी भेदून जॉर्डन हेंडरसनच्या पासवर अप्रतिम गोल केला आणि लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्याच आक्रमणात लिव्हरपूलला मिळालेल्या यशामुळे न्यूकॅसलचे धाबे दणाणले. १७व्या मिनिटाला लिव्हरपूलसाठी पुन्हा संधी चालून आली. मात्र, यावेळी स्टर्लिगची रणनीती चुकली. न्यूकॅसलनेही मग आक्रमक सुरुवात केली. या आक्रमक खेळात न्यूकॅसलकडूनही अप्रतिम खेळ झाला. ४५व्या मिनिटाला डॅर्ली जनमॅट याने गोलच्या दिशेने भिरकावलेला चेंडू लिव्हरपूलच्या सिमॉन मिग्नोलेट याने अप्रतिमरीत्या अडवून न्यूकॅसलला बरोबरी साधण्यापासून रोखले. मध्यंतरापर्यंत लिव्हरपूलने १-० अशी आघाडी कायम राखली होती.
मध्यंतरानंतर दोन्ही संघांमधील टशन आणखीनच वाढली. ७०व्या मिनिटाला जोए अ‍ॅलन याने गोल करून लिव्हरपूलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलने चवताळलेल्या न्यूकॅसलकडून रडीचा डाव सुरू झाला. ७८व्या मिनिटाला त्यांचा खेळाडू मौस्सा सिस्सोको याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. ८३व्या मिनिटाला सिस्सोकोला पुन्हा पिवळे कार्ड दाखविण्यात आले आणि न्यूकॅसलला १० खेळाडूंसह उर्वरित सामना खेळावे लागले. लिव्हरपूलने अखेपर्यंत २-० अशी आघाडी कायम राखत विजय निश्चित केला.