आठवडय़ाची मुलाखत : ब्रिज हल्दानिया, इंग्लंड खो-खो महासंघाचे कार्याध्यक्ष

‘‘इंग्लंड खो-खो संघाच्या पहिल्या ऐतिहासिक भारत दौऱ्याचे अर्थकारण पेलणे अतिशय आव्हानात्मक ठरले. सर्व खेळाडू आणि अन्य अधिकारी स्वखर्चाने येथे आलो आहोत. सुदैवाने टी-शर्ट्स आदी गोष्टींसाठी काही पुरस्कर्त्यांची मदत मिळाली, मात्र ही सुरुवात आहे. सरकारकडून भविष्यात आम्हाला योग्य पाठबळ मिळेल,’’ अशी अपेक्षा इंग्लंड खो-खो महासंघाचे कार्याध्यक्ष ब्रिज हल्दानिया यांनी व्यक्त केली.

‘‘सध्या इंग्लंडमध्ये आशियाई देशांशी नाते सांगणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. मात्र इंग्लिश मंडळीसुद्धा यात रस घेऊ लागली आहेत. त्यांच्यातही या खेळाचे आकर्षण निर्माण झाले आहे,’’ असे हल्दानिया यांनी सांगितले. इंग्लंडमध्ये खो-खो खेळ रुजवण्याचे श्रेय हल्दानिया यांना जाते. भारतात व्यावसायिक खो-खो खेळण्याचा अनुभव असलेल्या हल्दानिया यांनी राष्ट्रीय स्पध्रेत दोनदा राजस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. ब्रिटिश एअरवेजसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या हल्दानिया यांच्याशी इंग्लंडमधील खेळाच्या वातावरणाबाबत केलेली बातचीत-

 

  • भारत दौऱ्याच्या निमित्ताने इंग्लंडचा संघ आंतरराष्ट्रीय पदार्पण करतो आहे का?

हो, आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याशिवाय आमचा संघ व्यावसायिकदृष्टय़ा समृद्ध होणार नाही, याची जाणीव होती. भारत हे यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. कारण ते खो-खोचे जन्मदाते आहेत. भारतीय खो-खो महासंघानेसुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे तीन सामन्यांची मालिका होऊ शकली. भारताशी लढत देणे, हे आव्हान असले तरी खेळाची नजाकत शिकण्याची ही मोठी संधी आहे. चालू वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  • या दौऱ्यापूर्वी कोणती विशेष तयारी करण्यात आली?

मी गेल्या काही वर्षांत भारतामधील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाना हजेरी लावली आहे. या स्पर्धाचे व्हिडीओ चित्रीकरण आम्हाला तयारीसाठी उपयुक्त ठरले. याशिवाय काही सीडीज आणि ऑनलाइन उपलब्ध असलेल्या काही क्लिप्ससुद्धा पाहायला मिळाल्या.

  • इंग्लंडमधील खो-खोच्या सद्य:स्थितीबाबत तुम्ही काय सांगाल?

इंग्लंडमध्ये खो-खो हा खेळ अतिशय लोकप्रिय होतो आहे. दिवसेंदिवस खेळाडूंची संख्या वाढते आहे. आता जवळपास पाचशे खेळाडू हा खेळ खेळतात. २०१५मध्ये झालेल्या पहिल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पध्रेत १० संघ सहभागी झाले होते. त्या वेळी पुरुष-महिलांचे मिश्र संघ सहभागी झाले होते. मात्र मागील वर्षी झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय स्पध्रेवेळी आम्ही पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र गटांची रचना केली. त्या वेळी पुरुषांचे नऊ आणि महिलांचे पाच संघ सहभागी झाले होते. याच स्पध्रेतून भारत दौऱ्यासाठी इंग्लंडच्या संघाची निवड करण्यात आली. तेथील शाळा-महाविद्यालयांमध्ये हा खेळ सुरू करता येऊ शकेल. सध्या दोन शाळांमध्ये तसेच एका महाविद्यालयात हा सुरू झाला आहे. त्यामुळे लवकरच आंतरविद्यापीठ स्पर्धासुद्धा घेण्याचा आमचा इरादा आहे.

  • खेळ रुजवताना किती अडचणी आल्या?

देशातील खो-खोला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी दहा वष्रे मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीला खांबसुद्धा नव्हते, खेळाडूंना नियम समजवून सांगताना खूप दमछाक व्हायची, पण हळूहळू त्यांना ते कळू लागले. गेल्या काही वर्षांत ते नियमानुसार खेळू लागले आहेत.

  • इंग्लंडमध्ये खो-खो व्यावसायिकपणे कसा विकसित झाला?

आम्ही तीन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये खो-खोला व्यावसायिकरीत्या प्रारंभ केला. आता ‘इंग्लंड खो-खो महासंघ’ या नावाने राष्ट्रीय संघटना अस्तित्वात आहे. आता सामनाधिकारी आणि प्रशिक्षक यांचे मंडळसुद्धा सक्रिय आहे. सुरुवातील विविध शहरांचे संघ खेळावे, याकरिता आम्ही काही खो-खो क्लब स्थापन करण्याकडे लक्ष वेधले. मात्र इंग्लंडमधील विविध धर्माच्या समुदायांनी आपापले संघ स्थापन करायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही शाखांमधील मंडळींचीसुद्धा संघनिर्मितीमध्ये मदत झाली. मी या विविध संघांना जाऊन स्वत: मार्गदर्शनाचे धडे दिले.