|| आविष्कार देशमुख

गेल्या वर्षीचे विजेतेपद बाजूला सारून यंदाच्या हंगामातही रणजी करंडकावर नाव कोरण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सरावाचा श्रीगणेशा केला. त्याच दृष्टिकोनातून संपूर्ण मोसमासाठी रणनीती आखण्यात आली. रणजी करंडकाचे विजेतेपद हाच ध्यास घेऊन सराव करा, हेच पहिल्या दिवसापासून खेळाडूंच्या मनात बिंबवण्यात आले. खेळाडूंनीही माझी हीच गोष्ट मनावर घेतली. त्यानुसार कामगिरी करत हाती घेतलेले कार्य सुफळ संपूर्ण करत विदर्भाने दुसऱ्यांदा करंडकावर नाव कोरले, अशी प्रतिक्रिया विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी व्यक्त केली. रणजी करंडकाच्या विजेतेपदापर्यंतच्या प्रवासाविषयी पंडित यांच्याशी केलेली ही खास बातचीत-

  • चेतेश्वर पुजारासाठी विशेष रणनीती आखली होती का?

नक्कीच. याचे संपूर्ण श्रेय आदित्य सरवटेला जाते. प्रत्येक संघासाठी आणि प्रत्येक खेळाडूसाठी रणनीती आखली जाते. मात्र अंतिम सामन्यापर्यंत आम्ही एका खेळाडूवर अधिक लक्ष केंद्रित केले नव्हते. एकच खेळाडू संपूर्ण सामन्यात विशेष कामगिरी करू शकत नाही, हे मी माझ्या क्रिकेटच्या अनुभवातून सांगू शकतो. पुजाराला झटपट बाद करण्यासाठी आदित्यने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचे चित्रीकरण वारंवार पाहिले आणि पुजारासाठी सापळा रचला. दोन्ही डावात पुजाराला बाद करणाऱ्या सरवटेने यंदाच्या हंगामात सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

  • खेळाडूंवर विजेतेपद राखण्याचा दबाव होता का?

होय! कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामन्यात खेळाडूंवर पहिल्या चेंडूपासूनच दबाव असतो. दबाव टाळता येत नाही. मात्र आम्ही मानसिक कणखरता आणि क्रिकेटच्या मूल्यांची सांगड घातली. या दोन्ही गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करूनच आम्ही वर्षभर सराव केला.

  • तुम्ही कायम शिस्तप्रिय प्रशिक्षकाच्या भूमिकेत असतात?

होय, मी अगदी शिस्तप्रिय माणूस आहे. मला खेळात शिस्त अधिक प्रिय आहे. मी जे काही करतो, ते अनेकांना आवडत नाही. मात्र ते माझे काम आहे, असे मी मानतो. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने सोपवलेली जबाबदारी समर्थपणे पेलण्याची माझी इच्छा होती.