आठवडय़ाची मुलाखत : द्युती चंद, आंतरराष्ट्रीय धावपटू

‘‘लहाणपणापासून खडतर आव्हानांना धर्याने सामोरे जाण्याचे ‘बाळकडू’च जणू मला मिळाले होते. त्यामुळेच मला खेळापासून दूर करू पाहणाऱ्यांना पुरून उरले. राष्ट्रीय स्पर्धामध्ये एकदाही पराभव न पत्करता खेळाप्रति असलेली आत्मियता वारंवार सिद्ध केली. पण, आजही कोणत्याही महत्त्वाच्या स्पध्रेला जाण्यापूर्वी धाकधूक लागली असतेच. तशी रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत खेळतानाही असेल, परंतु बारा वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे, या आनंदी धक्क्याने ती धाकधूक नाहीशी झाली आहे. आता रिओत सर्वोत्तम कामगिरी.. हेच ध्येच आहे,’’ असे मत रिओ ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या द्युती चंद हिने ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पध्रेत ११.३० सेकंदाची वेळ नोंदवून तिने रिओवारी निश्चित केली. याच सोबत तिने शनिवारी स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम दोन वेळा मोडला. हिटमध्ये तिने ११.२४ सेकंदाची वेळ नोंदवली, तर अंतिम फेरीत ११.३० सेकंदात शर्यत पूर्ण करून ऑलिम्पिक पात्रतेसाठीची ११.३२ सेकंदाच्या अटीची पूर्तताही केली. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पध्रेत पी. टी. उषा यांनी १०० मीटर शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यानंतर जवळपास ३६ वर्षांनी द्युतीने हा मान पटकावला आहे. तिच्या या प्रवासाबद्दल थेट कझाकिस्तानहून तिच्याशी केलेली ही बातचीत..

* रिओ ऑलिम्पिक पात्रता निश्चित केल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया?

या क्षणी मला जो आनंद झाला आहे, त्यापुढे गगनही ठेंगणे वाटते. हे वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक होते, परंतु माझ्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले, याचा अधिक आनंद आहे. अगदी अखेरच्या क्षणाला मी ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे. त्यामुळे थोडेसे दडपण आहेच. कठीण समयी माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्वाचे आभार.

* लिंग चाचणीबाबतच्या न्यायालयीन लढय़ाचा खेळावर आणि मानसिकतेवर झालेल्या परिणामांतून तू स्वत:ला कसे सावरलेस ?

खरे सांगायचे तर या सर्व गोष्टींकडे मी अजिबात लक्ष दिले नाही. सगळ्यांनी मला खेळावर लक्ष केंद्रित करायला सांगितले होते. त्यामुळे न्यायालयात काय चालते किंवा काय निकाल येतो, याचा विचार केलाच नाही. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न मी पाहिले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील होते. तेच ध्येय मला गाठायचे होते. आज ते सत्यात उतरले आहे.

* ऑलिम्पिकमध्ये आव्हान अधिक खडतर होणार आहे. त्यामुळे ११.२४ सेकंदाची वेळ पदक पटकावण्यासाठी पुरेशी नाही, याची कल्पना तुला असेलच?

हो, मी ऑलिम्पिक विक्रम पाहिले आहेत. त्यामुळे तेथील आव्हानाची कल्पना मला आली आहे. फेडरेशन चषक स्पध्रेनंतर एका महिन्यात माझ्या वेळेत बरीच सुधारणा केली आहे. ऑलिम्पिकसाठी अजून माझ्याकडे महिन्याभराचा कालावधी आहे आणि चांगली कामगिरी करण्याचा मला आत्मविश्वास आहे. ऑलिम्पिकमध्ये १०.८० सेकंदापर्यंत वेळ नोंदवावी लागेल, तरच पदकाची आशा करू शकते. पण सध्या पदकाचा विचार न करता जलद वेळ नोंदवण्याचे ध्येय आहे.

* पी. टी. उषा यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर प्रकारात प्रतिनिधित्व करणारी तू पहिली भारतीय महिला आहेस, याचे दडपण वाटते का? इतक्या वर्षांत भारताला १०० मीटर प्रकारात ऑलिम्पिक धावपटू का घडविता आले नाहीत?

दडपण नाही, पण हे ऐकून आत्मविश्वास नक्की उंचावला आहे. उषा यांच्यावेळी पात्रता वेळ नोंदवण्याची पद्धत नव्हती. जलद धावपटूला ऑलिम्पिकमध्ये पाठवले जायचे. आता ऑलिम्पिकसाठी पात्रता वेळ निश्चित केली जाते आणि त्यानंतरच प्रवेश मिळतो. राहिली गोष्ट इतक्या वर्षांनंतर धावपटू घडविण्याची. भारतात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत, परंतु एखादे आंतरराष्ट्रीय पदक पटकावल्यानंतर ते सरावात दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना मोठी झेप घेता येत नाही. माझ्याबाबतीत मी हे होऊ दिले नाही. सातत्यपूर्ण कामगिरी हे लक्ष्य कालही होते, आजही आहे आणि भविष्यातही राहील..