|| प्रशांत केणी
यशानंतर बऱ्याचदा सकारात्मक बदल पाहायला मिळतात, परंतु काही वेळा ते पचवता न आल्याने त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. १९८३च्या विश्वविजेतेपदाने भारतात क्रिकेटमय क्रांतीची लाट आली. मग १९८७च्या रिलायन्स विश्वचषकाचे यजमानपद भारताने खेचून आणले. त्यानंतर क्रिकेटच्या नकाशावर भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आला, ते वर्चस्व अद्यापही अबाधित आहे; परंतु १९९६च्या विश्वविजेतेपदानंतर श्रीलंकेच्या क्रिकेटचा आलेख खालावला. त्यांच्या अर्थकारणाला या ऐतिहासिक घटनेमुळे गती मिळण्याऐवजी ते अगतिक झाले. कारण श्रीलंकेच्या क्रिकेट प्रशासनाला भ्रष्टाचाराने ग्रासले. संघटनेवर ताबा मिळवण्याची सत्तास्पर्धा अधिक तीव्र झाली. परिणामी दर्जेदार क्रिकेटपटू घडण्याचे प्रमाण श्रीलंकेत मंदावले.
नेमक्या याच मुद्दय़ांवर कुमार चोक्षानंद संगकाराने २०११ मध्ये लॉर्ड्सवरील मेरिलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) कॉलिन काऊड्रे क्रिकेट सद्भावना वार्षिक व्याख्यानात प्रकाशझोत टाकला. चोक्षानंद म्हणजे सिंहली भाषेत स्पष्टवक्ता. त्याने आपल्या वाणीने क्रिकेटजगताला जिंकले. श्रीलंकेच्या क्रिकेट प्रशासनाचा इतिहास आणि भ्रष्टाचार याबाबत त्याने सडेतोडपणे मत मांडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकीर्द चालू असलेला तो पहिला आणि सर्वात युवा व्याख्याता ठरला होता. या व्याख्यानानंतर श्रीलंकेचे क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगामागे यांनी याबाबत त्वरित चौकशीचे फर्मान सोडले होते; परंतु तरीही क्रिकेट इतिहासातील ते एक सर्वोत्तम व्याख्यान मानले जाते. नुकतेच संगकाराकडे ‘एमसीसी’चे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीची सूत्रे सांभाळणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेच्या पदावर वर्णी लागलेला तो पहिला ब्रिटिशेतर व्यक्ती आहे. त्यामुळेच श्रीलंका आणि जागतिक क्रिकेट या घडामोडीकडे आशेने पाहात आहे.
३ मार्च २००९ या दिवशी लाहोरच्या गदाफी स्टेडियमबाहेर श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सहा क्रिकेटपटूंमध्ये कुमार संगकाराचा समावेश होता. त्या घटनेला आता दहा वष्रे लोटली आहेत. श्रीलंकेला दोन आठवडय़ांपूर्वीच बॉम्बस्फोट मालिकेने हादरवले आहे. तसे पाहिल्यास श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या आशियाई देशांपुढे दहशतवादाचे मोठे आव्हान समोर असते. याशिवाय भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया वगळता अन्य देशांमध्ये आर्थिक आणि प्रशासकीय अस्थर्य नेहमीचेच असते. ‘एमसीसी’च्या माध्यमातून या देशांना दिशा देण्याचे आव्हान संगकारापुढे असेल.
यशस्वी कर्णधार आणि प्रेरणादायी क्रिकेटपटू
निवृत्तीनंतर समालोचनाकडे वळणाऱ्या संगकाराची क्रिकेट कारकीर्द १५ वर्षांची. श्रीलंकेचा यशस्वी कर्णधार आणि प्रेरणादायी क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक कमावणाऱ्या संगकाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण २८,०१६ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या एकदिवसीय फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे, तर कसोटी फलंदाजांमध्ये सहाव्या स्थानावर आहे. संगकाराने महेला जयवर्धनेच्या साथीने अनेक भागीदाऱ्या आणि विक्रम केले आहेत. याच मित्रासोबत तो ‘मिनिस्ट्री ऑफ क्रॅब’ हे हॉटेलसुद्धा कोलंबोत चालवत आहे. २००५ ते २०१५ या कालखंडात ‘आयसीसी’च्या कसोटी क्रमवारीतील अग्रस्थानावर त्याने बराच काळ आपले वर्चस्व राखले होते. याशिवाय ‘आयसीसी’चे वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू, सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू या पुरस्कारांवरही त्याने नाव कोरले आहे. श्रीलंकेला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००७ आणि २०११ तसेच ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये २००९ आणि २०१२ मध्ये विजेतेपदाने हुलकावणी दिली. या प्रत्येक सामन्यात संगकाराची झुंज संस्मरणीय होती. २०१४ मध्ये श्रीलंकेला ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपद प्राप्त झाले. या यशात सामनावीर संगकाराचा सिंहाचा वाटा होता. खेळ आणि वागणुकीमुळे सर्वाची मने जिंकत आलेल्या संगकाराकडून यापुढेही क्रिकेटजगताच्या मोठय़ा अपेक्षा आहेत.
शाळेचे योगदान
दऱ्याखोऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले कँडी हे संगकाराचे जन्मस्थान. वडील स्वर्णकुमार हे व्यवसायाने कायदेतज्ज्ञ. त्यामुळे त्यांच्या नावाचा दबदबा होता. संगकाराला दोन बहिणी आणि एक भाऊ. या तिघांनीही खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध केले होते. ट्रिनिटी शाळेत संगकाराने शिक्षण घेतले. अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टींत त्याला रस होता. प्रारंभी टेनिस आणि टेबल टेनिस या खेळांकडे तो वळला. कँडी गार्डन क्लब कोर्टवर त्याच्या वडिलांनी या खेळांचे उत्तम मार्गदर्शन त्याला दिले. कोर्टबाहेर बसून खेळाच्या अनेक तांत्रिक पुस्तकांचे ज्ञानही ते त्याला देत. नंतर बॅडमिंटन, जलतरण आणि क्रिकेट या खेळांमध्येही संगकाराला आवड निर्माण झाली. बॅडमिंटन आणि टेनिसमध्ये तर त्याने राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली; परंतु क्रिकेटमधील त्याची गुणवत्ता ट्रिनिटीचे तत्कालीन प्राचार्य लेफ्ट. कर्नल लिओनार्ड डी अल्विस यांनी हेरली. मग त्यांनी संगकाराच्या आईला शाळेत बोलावून मुलाला क्रिकेटकडेच लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच या शाळेचा क्रिकेटमधील हा ध्रुव तारा घडवण्यात सिंहाचा वाटा आहे. २००९ मध्ये संगकाराकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानिमित्त ट्रिनिटी शाळेत सत्कार करण्यात आला. त्या वेळी संगकाराने म्हटले की, कुटुंबीय, शिक्षक आणि प्रशिक्षक यांच्या योगदानामुळेच मी ही प्रतिष्ठेची जबाबदारी प्राप्त करू शकलो. हा कार्यक्रम संपल्यावर तो शाळेच्या शिक्षकांना आणि मैदानावरील कर्मचाऱ्यांना भेटला. अनेकांच्या आशीर्वादांसोबत काही जणांच्या खांद्यांवर त्याने डोके ठेवले. त्या वेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
prashant.keni@expressindia.com