आठवडय़ाची मुलाखत : प्रशांत मोरे, विश्वविजेता कॅरमपटू
बर्मिगहॅममध्ये काही दिवसांपूर्वी विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धा झाली आणि यामध्ये महाराष्ट्राच्या प्रशांत मोरेने जेतेपदाला गवसणी घातली. प्रशांतची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्याने जगज्जेतेपदाला गवसणी घातली; पण विश्वविजेता झाल्यावरही आपल्याला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकता आलेली नाही, ही खंत वाटते आहे, अशी भावना त्याने दिलेल्या खास मुलाखतीमध्ये व्यक्त केली. या स्पर्धेचा त्याचा अनुभव, स्पर्धेसाठी केलेले काही प्रयोग, विजयाचे रहस्य, कॅरमचा प्रसार आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा याबाबत त्याने आपली मते व्यक्त केली.
- तू विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकून अग्रस्थानावर विराजमान झाला आहेस. याबद्दल काय सांगशील?
माझी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. पहिल्याच स्पर्धेत मी विश्वविजेता ठरलो, हा आनंद शब्दांत वर्णन करता येऊ शकत नाही; पण या विजयाने माझ्या डोक्यात नक्कीच हवा गेलेली नाही. मी जमिनीवरच आहे आणि कायम राहीन. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी फक्त निमित्तमात्र होतो, असे मला वाटते. ही देवाची देणगी आहे. विश्व अजिंक्यपदाला मी गवसणी घातली असली तरी मला अजून राष्ट्रीय स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता माझे ध्येय राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे असेल.
- या विजेतेपदाचे श्रेय कोणाला देशील?
माझे आई-बाबा आणि अरुण केदार यांना मी हे श्रेय देईन. या तिघांनी मला प्रोत्साहन दिले आहे. लहानपणापासूनच मी बाबांना खेळताना पाहत होतो. त्यामुळे मी फक्त कॅरमच खेळत राहिलो, अन्य कोणतेही खेळ मला येत नाहीत. नवव्या वर्षांपासून मी कॅरम खेळायला सुरुवात केली. कॅरमचे बाळकडू मला बाबांकडूनच मिळाले. ते राष्ट्रीय स्तरावर कॅरम खेळले आहेत. त्यांच्यामुळेच कॅरमची गोडी निर्माण झाली आणि अजूनपर्यंत तेच मला कॅरम शिकवतात. आईने मला कॅरम खेळता यावा, यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. अरुण सर हे माझ्यासाठी गुरूसमान आहेत. त्यांनी मला भरपूर पाठिंबा दिला आहे, त्याचबरोबर खेळातील प्रत्येक समस्येचे निवारण त्यांनी केले आहे. त्यांनी माझ्यावर जी मेहनत घेतली आणि जो विश्वास दाखवला, त्याचेच हे फळ आहे.
- विश्वविजेतेपदाच्या प्रवासाविषयी काय सांगशील?
उपांत्यपूर्व फेरीत मी श्रीलंकेच्या गतविश्वविजेत्या फर्नाडोला पराभूत केले. उपांत्य फेरीत माजी विश्वविजेत्या योगेश परदेशीवर मात केली, तर अंतिम फेरीत आयसीएफविजेत्या रियाझ अकबल अलीवर विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली. या तिन्ही फेऱ्या एकाच दिवशी होत्या. या स्पर्धेला जाण्यापूर्वी बरेच जण मला सांगत होते की, तू जेतेपद पटकावशील. या वेळी मनाशी फक्त एवढेच ठरवले होते की, आतापर्यंत गाठीशी असलेला १७ वर्षांचा अनुभव पाच तासांमध्ये पणाला लावायचा. १७ वर्षांचा अनुभव आणि पाच तासांची एकाग्रता यामुळे माझे आयुष्यच बदलले. ही मनोधारणाच माझ्या विजयाचे रहस्य आहे.
- भारतामध्ये बोरिक पावडरवर सराव करता येतो, पण या स्पर्धेत पोटॅटो स्टार्च पावडर वापरली जाते. ही फार मोठी तफावत तू कशी भरून काढलीस?
ही तफावत भरून काढण्यासाठी मी काही प्रयोग केले. मी लिपबामचा (मुली ज्या ओठांसाठी वापर करतात) वापर केला. बोटांना लिपबाम लावून खेळल्यावर खेळ जलद व्हायला लागला. कॅरमचा ब्रेक लावताना मी ज्या सोंगटीला पहिले मारायचे असते ती थोडी लांब लावत होतो. स्पर्धेसाठी निवड झाल्यावर मी लिपबामचा वापर करायला सुरुवात केली, खेळाचा वेग वाढला. त्याचा मी सराव केला आणि त्यामुळे स्पर्धेत खेळावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले.
- आपल्या देशातले बरेच खेळ मोठे झाले, पण कॅरमच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही, असे वाटते का?
नाही, मला ही गोष्ट पटत नाही, कारण कॅरमचा महाराष्ट्रामध्ये फार मोठय़ा प्रमाणात प्रसार आणि प्रचार होताना दिसत आहे. फार मोठय़ा प्रमाणावर कॅरम खेळला जातो. राज्य स्पर्धेसाठी एक लाख रुपयांचे पारितोषिक असते. अरुण सरांचा कॅरम हा खेळ मोठा होण्यामध्ये मोलाचा वाटा आहे.
- मोठी स्पर्धा जिंकून आल्यावर देशामध्ये किंवा राज्यामध्ये सत्कार करतात, पारितोषिके जाहीर करतात. तू विश्व अजिंक्यपद जिंकून आलास. तुझी सरकारकडून काय अपेक्षा आहे?
अपेक्षा अशी काही मोठी नाही. अन्य खेळांसारखा कॅरमचाही सन्मान केला जावा. त्यांनी किती पारितोषिक द्यावे, हे आम्ही सांगणे उचित नाही; पण ते जो काही आमचा सन्मान करतील त्याचा आम्ही नक्कीच स्वीकार करू.