|| प्रशांत केणी, मुंबई

आठवडय़ाची मुलाखत : विनायक सामंत, मुंबईचे प्रशिक्षक

मुंबईसाठी स्पर्धा जिंकणे हे महत्त्वाचे आहेच. त्यासाठी खेळाडूंच्या दृष्टिकोनात मुंबईची खडूस वृत्तीच प्रेरणादायी ठरेल, असे मत मुंबईचे प्रशिक्षक विनायक सामंत यांनी व्यक्त केले.

यंदाच्या हंगामात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आम्ही गतवर्षीप्रमाणेच वर्चस्व गाजवू. मग ट्वेन्टी-२० स्पर्धा आणि अखेरीस रणजी करंडक स्पध्रेचे आव्हानसुद्धा तयारीनिशी पेलू, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. मुंबईच्या चार रणजी विजेतेपदांमध्ये खेळाडू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सामंत यांच्याशी केलेली खास बातचीत-

  • गेला हंगाम आणि आगामी हंगाम या दोन हंगामांकडे तुम्ही कशा रीतीने पाहाल?

गेल्या हंगामातून माझ्यासाठी बरेच काही शिकण्यासारखे होते. मागील हंगामात तयारीसाठी पुरेसा वेळ नव्हता, यंदाच्या वर्षांतही नाही. पण येत्या हंगामात मला खेळाडू माहीत आहेत. त्या दृष्टीने निवड समितीशी समन्वय साधून उत्तम संघबांधणीकडे लक्ष देत आहे.

  • येत्या हंगामात रणजी, विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धाना सामोरे जाताना तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?

मुंबईकडे शार्दूल ठाकूर, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, शिवम दुबे आणि पृथ्वी शॉ यांच्यासारखे बरेच इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी हे खेळाडू उत्तम कामगिरी करतात. त्यामुळेच गेल्या वर्षी हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकता आली, तर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी झाली. लाल चेंडूचे क्रिकेट हे वेगळे आहे आणि त्यातही वर्चस्व दाखवण्यासाठी योग्य रणनीती आखण्यात आली आहे.

  • भारत ‘अ’ किंवा युवा संघांच्या मालिका मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. या परिस्थितीत गोलंदाजीच्या माऱ्याला सांभाळणे किती आव्हानात्मक असते?

होय, हे आव्हानात्मकच आहे. गेल्या वर्षी भरवशाचे गोलंदाज मुंबईसाठी उपलब्ध नव्हते. तुषार देशपांडे हा महत्त्वाच्या क्षणी बळी मिळवून देणाऱ्या गोलंदाजाची उणीव आम्हाला तीव्रतेने भासली. यंदाच्या हंगामात तुषार कसा उपलब्ध होईल, यासाठी मी प्रयत्नशील आहे. याचप्रमाणे वेगवान गोलंदाजांची दुसरी फळी निर्माण करणे, हे माझे महत्त्वाचे लक्ष्य असेल. त्यामुळे हंगामपूर्व काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आता वेळ कमी असला, तरी खूप उशीर झालेला नाही. पण ही प्रक्रिया महत्त्वाची असते, असे मला वाटते.

  • हंगामपूर्व सरावाला कितपत महत्त्व असते?

काही दिवसांनी बापुना चषक स्पध्रेत आम्ही खेळणार आहोत. वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमी आणि घणसोलीच्या रिलायन्स मैदानावर आमचा सराव सुरू झाला आहे. खेळाडूंचा समन्वय, एकता आणि नेतृत्व या दृष्टीने संघबांधणी हा या प्रक्रियेतील माझा महत्त्वाचा हेतू होता. गेल्या हंगामात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाड असे चार कर्णधार झाले. परंतु यंदाच्या हंगामासाठी श्रेयस अनुपलब्ध असेल तर सूर्यकुमार यादव हा उत्तम नेतृत्व करू शकेल.

  • यंदाचा देशांतर्गत हंगाम चालू असेल, तेव्हा भारतीय संघाच्याही अनेक मालिकाही होत असतील. त्यामुळे मुंबईतील आंतरराष्ट्रीय खेळाडू येत्या हंगामासाठी फारसे उपलब्ध असतील असे वाटत नाही. याविषयी तुम्ही काय सांगाल?

मुंबईने रणजी आणि अन्य स्पर्धा जिंकणे, हे जसे माझे लक्ष्य आहे, तसेच या संघातील अधिकाधिक खेळाडू हे भारतासाठी खेळले पाहिजेत, हा माझा दृष्टिकोन असतो. कारण देशांतर्गत हंगामाचे ध्येय हे देशासाठी गुणी खेळाडू निर्माण करण्याचे आहे. श्रेयस आता भारतीय संघातून खेळतो आहे, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

  • आता उदयोन्मुख क्रिकेटपटूंना अनेक मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळाव्या लागतात. या स्थितीत रणजी क्रिकेटसाठी आवश्यक विकास त्यांचा साधला जातो का?

मुंबईच्या क्लब आणि व्यावसायिक क्रिकेटमधूनच मोठय़ा प्रमाणात खेळाडू घडत आहेत. ‘आयपीएल’मुळे फलंदाजांचे फटके, दृष्टिकोन अशा प्रकारे क्रिकेटमध्ये खूप फरक पडला.