Lords Cricket Ground: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या मैदानाला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वाटतं की, त्याने एकदा तरी या मैदानावर क्रिकेट खेळावं. पण, काही मोजकेच खेळाडू असतात ज्यांना या मैदानावर खेळण्याची संधी मिळते. या मैदानाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या मैदानावरील खेळपट्टी ही पूर्णपणे सरळ नाही. तर, एका बाजूने उतार आहे. याचा गोलंदाजांना चांगलाच फायदा होतो. त्यामुळेच या मैदानावर शतक झळकावणाऱ्या फलंदाजांना विशेष मान दिला जातो.

क्रिकेटमध्ये गरजेनुसार असंख्य बदल करण्यात आले आहेत. मात्र, होम ऑफ क्रिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावरील खेळपट्टीत अद्यापही बदल करण्यात आलेला नाही. जगातील कुठल्याही स्टेडियमवरील खेळपट्टी पाहिली, तर ती पूर्णपणे सरळ असते. पण, लॉर्ड्सच्या मैदानावरील खेळपट्टीला एका बाजूने उतार आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावरील एक बाजू ही नर्सरी एंडची आहे. तर दुसरी बाजू ही पॅव्हेलियन एंडची आहे. ही खेळपट्टी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला जाताना उतरत्या दिशेला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर असलेला मिडिया बॉक्स हा नर्सरी एंडच्या दिशेने आहे. तर दुसऱ्या बाजूला पॅव्हेलियन एंड आहे. जर एखादा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज पॅव्हेलियन एंडच्या बाजूने गोलंदाजी करत असेल, तर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांचा चेंडू टप्पा पडून सहज आत येईल. याउलट जर एखादा गोलंदाज नर्सरी एंडच्या बाजूने गोलंदाजी करत असेल, तर गोलंदाजाचा चेंडू टप्पा पडून बाहेर जाण्यास सोपं होतं. त्यामुळे ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी खूप फायदेशीर ठरते.

मालिका १-१ ने बरोबरीत

दोन्ही संघांमध्ये सुरू असलेली ५ कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने दमदार विजयाची नोंद केली होती. तर दुसरा सामना एजबस्टनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि इंग्लंडवर मोठा विजय मिळवला. सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा सामना जिंकून भरतीय संघ २-१ ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.