दोहा : गतविश्वचषकात उपविजेतेपद मिळवून यंदाच्या स्पर्धेत क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने कांस्यपदक जिंकण्याची यशस्वी कामगिरी केली. क्रोएशियाने तिसऱ्या स्थानाच्या लढतीत मोरोक्कोवर २-१ असा विजय मिळवला. क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकेल अशी चर्चा सुरू होती. मात्र, सामन्यानंतर मॉड्रिचने या चर्चाना पूर्णविराम दिला. निवृत्तीबाबत निर्णय अवकाशाने घेणार असल्याचे मॉड्रिचने स्पष्ट केले.
‘‘भविष्याबाबत कोणताही निर्णय घेण्याची मी घाई करणार नाही. दोन वर्षांनी जर्मनीमध्ये युरो अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. तोपर्यंत मी खेळण्याबाबत साशंकता आहे. मला टप्प्याटप्प्याने विचार करावा लागेल. राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना मला फार मजा येते. आमच्या कामगिरीने मी खूश आहे. पुढील वर्षी नेशन्स लीगमध्ये खेळण्याची माझी योजना आहे. त्यानंतर मी युरो स्पर्धेबाबत विचार करेन,’’ असे ३७ वर्षीय मॉड्रिच म्हणाला.
क्रोएशियाच्या संघाने गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केली असून मध्यरक्षक मॉड्रिचची या यशात सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. आता क्रोएशिया संघ नेशन्स लीगचे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे. पुढील वर्षी जूनमध्ये क्रोएशिया, नेदरलँड्स, इटली आणि स्पेन या चार संघांत नेशन्स लीगचे अखेरच्या टप्प्याचे सामने रंगणार आहेत.
क्रोएशियाच्या संघात गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला होता. यंदा उपांत्य फेरीत लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने त्यांच्यावर मात केली. त्यामुळे क्रोएशियाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, या दोन स्पर्धातील कामगिरीसह क्रोएशियाच्या संघाने जागतिक फुटबॉलवर आपला ठसा उमटवल्याचे मत मॉड्रिचने व्यक्त केले.
‘‘क्रोएशियन फुटबॉलसाठी आमचे यश खूप मोठे आहे. आम्हाला जेतेपदापासून वंचित राहावे लागले, पण आम्ही खूप जवळ पोहोचलो याचे समाधान आहे. आम्ही विजेते म्हणूनच मायदेशी परत जाऊ. क्रोएशियाच्या संघाला आता कोणीही कमी लेखू शकत नाही. आम्ही सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर स्वत:ला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील बलाढय़ संघ म्हणून सिद्ध केले आहे,’’ असे मॉड्रिचने नमूद केले. मॉड्रिचने क्रोएशियाचे १६२ सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. तो क्रोएशियाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो.
चाहत्यांच्या मोरोक्कोकडून अपेक्षा वाढल्या -रेग्रागुई
क्रोएशियाकडून पराभव पत्करावा लागल्याने मोरोक्कोला यंदाच्या विश्वचषकात पदकापासून वंचित राहावे लागले. मात्र, कोणालाही अपेक्षा नसताना मोरोक्कोने उपांत्य फेरीपर्यंतची मजल मारली. मोरोक्कोच्या या कामगिरीबाबत प्रशिक्षक वालिद रेग्रागुई यांनी आनंद व्यक्त केला. ‘‘आम्हाला आमच्या चाहत्यांना आनंद द्यायचा होता. त्यांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करायची होती. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. विश्वातील सर्वोत्तम चार संघांमध्ये आमचा समावेश होता. आम्ही कधीही हार मानली नाही. मात्र, आमच्या या कामगिरीमुळे जगभरातील चाहत्यांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. चार वर्षांनी होणाऱ्या पुढील विश्वचषकात आमच्यावर अतिरिक्त दडपण असेल. यंदाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे सोपे नसेल, पण आम्ही प्रयत्न नक्कीच करू,’’ असे रेग्रागुई यांनी सांगितले.
मॉड्रिच अनेक वर्षे खेळेल -डालिच
मॉड्रिच ३७ वर्षांचा असला, तरी तो अजून बरीच वर्षे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळेल अशी क्रोएशियाचे प्रशिक्षक झ्लाटको डालिच यांना अपेक्षा आहे. ‘‘मॉड्रिच आमचा कर्णधार आहे. तो आमचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने यंदाच्या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. तो ३७ वर्षांचा आहे, पण २० वर्षांचा असल्याप्रमाणे खेळला. तो आता लवकरच निवृत्ती पत्करेल असे काही जणांना वाटते आहे. मात्र, तो अजून बरीच वर्षे खेळेल असा माझा अंदाज आहे,’’ असे डालिच म्हणाले.