वीरेंद्र सेहवाग, कर्णधार गौतम गंभीर, उनमुक्त चंद आदी स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या दिल्ली संघास यजमान महाराष्ट्र संघ कसा सामोरा जातो हीच या दोन संघांमधील रणजी क्रिकेट सामन्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चार दिवसांच्या या लढतीस गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारी प्रारंभ होत आहे.
महाराष्ट्राने हरयाणा व पंजाबकडून पराभव स्वीकारल्यानंतर दोन सामनेजिंकून अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांनी सौराष्ट्रावर एक डावाने विजय मिळविला आहे तर राजस्थानला त्यांनी नऊ विकेट्सने हरविले होते. दिल्ली संघाने यंदाच्या साखळी सामन्यांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यांनी सौराष्ट्रावर नऊ गडी राखून विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी राजस्थान व ओडिशा या दोन्ही संघांना एक डावाने पराभूत केले आहे.
पहिल्या फळीतील अनुभवी फलंदाजांचे अपयश हीच महाराष्ट्रापुढील मोठी समस्या आहे. दिल्लीच्या रजत भाटिया, परविंदर अवाना यांच्या गोलंदाजीस ते कसे तोंड देतात यावरच महाराष्ट्राचे यश अवलंबून आहे. रोहित मोटवानी याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या महाराष्ट्राची फलंदाजीची मुख्य मदार चिराग खुराणा, राहुल त्रिपाठी, केदार जाधव, विजय झोल, संग्राम अतितकर, अंकित बावणे, श्रीकांत मुंढे यांच्यावर आहे. गोलंदाजीत समाद फल्लाह, श्रीकांत मुंढे, अनुपम संकलेचा, डॉमिनिक मुथ्थुस्वामी यांच्याकडून अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे.
सेहवाग, गंभीर, चंद यांच्याबरोबरच मिथुन मनहास, पुनीत बिश्त, रजत भाटिया यांच्यावर दिल्ली संघाच्या फलंदाजीची बाजू अवलंबून आहे. भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी सेहवाग, गंभीर व चंद यांच्यासाठी हे स्थानिक सामने सुवर्णसंधी असल्यामुळे ते चांगली कामगिरी करण्यास उत्सुक झाले आहेत. गोलंदाजीत अवाना, भाटिया, प्रदीप संगवान यांच्याकडून दिल्लीस मोठय़ा अपेक्षा आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
महाराष्ट्र : रोहित मोटवानी (कर्णधार व यष्टिरक्षक), संग्राम अतितकर, अवधूत दांडेकर, डॉमिनिक मुथ्थुस्वामी, स्वप्नील गुगळे, हर्षद खडीवाले, निखिल नाईक, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, चिराग खुराणा, अक्षय दरेकर, समाद फल्लाह, केदार जाधव, श्रीकांत मुंढे, अनुपम संकलेचा, विजय झोल.
दिल्ली : गौतम गंभीर (कर्णधार), उनमुक्त चंद, वीरेंद्र सेहवाग, मिथुन मनहास, रजत भाटिया, पुनीत बिश्त (यष्टिरक्षक), वरुण सूद, शिवम शर्मा, नवदीप सैनी, मनन शर्मा, विकास टोकस, मिलिंदकुमार, वैभव रावळ, प्रदीप संगवान, परविंदर अवाना, हिंमतसिंग, सुमीत नरवाल, ध्रुव शौरी.