महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून

पुणे : फक्त राज्यातच नाही तर देशभरातील कुस्तीप्रेमींना खुणावणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला शुक्रवारपासून पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे येथे सुरुवात होत असून, गतविजेत्या बाला रफीक शेखवर सर्वाच्या नजरा आहेत. त्याच्यासमोर पुन्हा एकदा गतउपविजेत्या अभिजित काटकेचे आव्हान असेल.

स्पर्धेचे उद्घाटन हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. याबरोबरच स्पर्धेचा समारोप हा मंगळवारी (७ जानेवारी) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

*  १० गटांमध्ये चुरस

या स्पर्धेअंतर्गत माती आणि गादीवरील (मॅट) प्रत्येकी १० अशा एकूण २० गटांमध्ये कुस्ती स्पर्धा घेतल्या जातील. वजनी गटांमध्ये ५७ किलो, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो आणि ‘महाराष्ट्र केसरी’ गट असे दहा वजनी गट आहेत. तब्बल ९०० ते ९५० कुस्तीगीर व १२५ पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे आले आहेत. मातीवरील कुस्तीसाठी दोन आणि मॅटवरील कुस्तीसाठी दोन आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज केले जात आहेत.

राज्यातील ४४ जिल्ह्यंमधील कुस्तीपटू दाखल झाले आहेत. तब्बल ९०० ते ९५० कुस्तीगीर व १२५ पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे दाखल झालेत. दिवसभरात पंचांचे दोन उजळणी सत्र पार पडले. तसेच शुक्रवारी सहभागी होणाऱ्या ‘अ’ विभाग (५७ व ७९ किलो) गटातील तब्बल २०० पैलवानांची गुरुवारी वैद्यकीय तपासणी व वजने करण्यात आली.

कुस्तीच्या आखाडय़ासाठी वापरलंय लिंबू, हळद, कापूर, ताक, तेल

कुस्ती स्पर्धेच्या आखाडय़ांसाठी लिंबू, हळद, कापूर, ताक, तेल वापरण्यात आले आहे. ते पाहता शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्ती या खेळाची भव्यता आणि लोकप्रियतेची प्रचीती स्पर्धेसाठी सज्ज झालेले आखाडे बघून येते. मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज झाले आहेत. येथे मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची ४० ब्रास माती आणून २०-२० ब्रासचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत. या मातीत १००० लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज १०० लिटर ताक आणि ६० लिटर तेल घालून मातीचे आखडे तयार झाले आहेत. पहिलवानांना स्पर्शातून, जखमांतून कोणत्याही प्रकारचे आजार किंवा लागण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असते. ४० बाय ४० चे रिंगण व ३० बाय ३० चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशा प्रकारे हे चारही आखाडे तयार आहेत. आखाडय़ांचा हा मुख्य मंच ६० बाय २१० फुटांचा असून त्या बाहेर १० फुटांचा भाग पंचांसाठी व त्याबाहेर १० फूट भाग पहिलवानांच्या तयारीसाठी सज्ज करण्यात आला आहे.

ऑलिम्पिकला साजेशी आकर्षक पदके

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यंदाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ऑलिम्पिकला साजेशी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके या स्पर्धेसाठी बनवण्यात आली आहेत. या पदकांचे वजन प्रत्येकी ४५० ग्रॅम आहे. प्रत्येकी व्यास ९० सेमी आहे. वरच्या भागात ‘अमनोरा’ लिहिलेले असून वर्तुळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा लोगो टाकण्यात आला आहे. रोज होणाऱ्या या स्पर्धेत दररोज संध्याकाळी पदक वितरण समारंभ होणार आहे. एकूण २० सुवर्ण, २० रौप्य व गादी विभागासाठी ४० तर मातीसाठी ३० कांस्य पदके तयार करण्यात आली आहेत.

आजचे वेळापत्रक

* सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा ‘अ’ विभाग (५७ व ७९ किलो)

* दुपारी १२ ते १ : वैद्यकीय तपासणी व वजने ‘ब’ विभाग (६१, ७० व ८६ किलो)

* दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता : कुस्ती स्पर्धा ‘अ’ व ‘ब’ विभाग (५७, ६१, ७०, ७९ व ८६ किलो)

* सायंकाळी ५ वाजता : उद्घाटन समारंभ: उपस्थिती अजित पवार