scorecardresearch

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : हर्षद, बाला रफीक, पृथ्वीराजचे विजय

सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने रत्नागिरीच्या संतोष दोरवडला चीतपट करीत सर्वानाच धक्का दिला.

(संग्रहित छायाचित्र)

वाई : महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, सिकंदर शेख यांनी नेत्रदीपक विजय मिळवून तिसरी फेरी गाठली. गादी गटात हर्षवर्धन सदगीर, साताऱ्याचा दिग्विजय जाधव, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, कौतुक डाफळे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने रत्नागिरीच्या संतोष दोरवडला चीतपट करीत सर्वानाच धक्का दिला. मुंबई शहरचा विशाल बनकर आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढत रंगतदार ठरली. दुसऱ्या फेरीत बनकरने एकेरी पटाचे पकड करीत गुणफलक हलता ठेवून बलदंड ताकदीच्या मोहोळचे तगडे आव्हान परतून लावले. महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखने लातूरच्या भारत कराडला सुरुवातीपासून वरचढ ठरू दिले नाही. एकेरी पट आणि दुहेरी पट यासारख्या अस्त्रांचा वापर करून तांत्रिक गुणांवर भारतला पराभूत केले. 

गादी गटात सुरुवातीलाच महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता आदर्श गुंड यांच्या लढतीत आदर्शने केलेले सर्व हल्ले धुडकावून लावत सदगीरने ही प्रतिष्ठेची लढत एकतर्फी जिंकली. पहिल्या फेरीत पिछाडीवर असताना आदर्शने दुसऱ्या फेरीत केलेला प्रतिकार हर्षवर्धनच्या आक्रमणापुढे फिका पडला. स्पर्धेतील ही प्रतिष्ठेची लढत हर्षवर्धनने ८-२ गुणांनी जिंकून स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले. पहिल्या फेरीतील विजयानंतर वाशिमचे प्रतिनिधित्व करणारा नैनेश निकमला दुसऱ्या फेरीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने पराभवाची धूळ चारली.

कडक उन्हामुळे सकाळच्या लढती रद्द

कडक उन्हाचा फटका महाराष्ट्र  केसरी कुस्ती स्पर्धेला गुरुवारी बसला. त्यामुळे सकाळच्या सत्रातील अनेक लढती रद्द झाल्या. या रात्री उशिरापर्यंत खेळवण्यात आल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra kesari wrestling competition harshad bala rafiq prithviraj s won match zws