महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके या दोन मल्लांची झुंज रंगली होती. मात्र जेव्हा हर्षवर्धन सदगीर विजयी झाल्याची घोषणा झाली तेव्हा हर्षवर्धनने पुढच्याच क्षणी स्पर्धा संपवून आपल्या सहकाऱ्याला म्हणजेच शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून घेतलं. खरंतर दोस्तीत कुस्ती अशी म्हण आहे. मात्र कुस्ती संपली आता दोस्ती असंच बहुदा मनाशी म्हणत हर्षवर्धन सदगीरने आपल्या सहकाऱ्याला म्हणजेच जो प्रतिस्पर्धी शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून धरलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षवर्धन सदगीरने शैलेशला जेव्हा खांद्यावर उचलून धरलं तो क्षण सगळ्यांनीच डोळ्यात साठवून घेतला. हर्षवर्धन सदगीर या मल्लाने फक्त महाराष्ट्र केसरीची गदाच जिंकली नाही तर उपस्थितांची मनंही जिंकली. शैलेश आणि हर्षवर्धन यांच्यामध्ये चाललेला सामना चुरशीचा होता. हे दोघेही वस्ताद काका पवार यांच्याच तालमीत तयार झालेले मल्ल. त्यामुळे साहजिकच दोघांना एकमेकांची कुस्ती खेळायची शैली माहित होती. त्यामुळे सुरुवातीला हा सामना काहीसा संथ झाला होता. मात्र नंतर या सामन्यातली चुरस वाढली. एक गुण जिंकून शैलेशने आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. अशात मोक्याच्या क्षणी हर्षवर्धनने बाजी मारली आणि शैलेशवर ३-२ अशी मात केली. त्यामुळे शैलेश जिंकेल की काय ? असं वाटत असतानाच हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kesri harshwardhan sadgir lifted opponent shailesh shelke on his shoulder after win the competition scj
First published on: 07-01-2020 at 20:01 IST