राहुल त्रिपाठी याने केलेल्या शानदार शतकाच्या जोरावर महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट सामन्यात राजस्थानविरुद्ध पहिल्या डावात ९१ धावांची आघाडी मिळविता आली.
राजस्थान संघाने पहिल्या डावात केलेल्या ३१८ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राने ५ बाद २४४ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्रिपाठी याने चिराग खुराणा याच्या साथीत १२९ धावा तर श्रीकांत मुंडे याच्या साथीत ७४ धावांची भागीदारी केली. त्यामुळेच महाराष्ट्राला पहिल्या डावात ४०९ धावांपर्यंत पोहोचता आले. त्रिपाठी याने शैलीदार खेळ करीत प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील दुसऱ्या शतकाची नोंद केली. त्याने ८ चौकार व दोन षटकारांसह ११९ धावा केल्या. खुराणा याने सहा चौकारांसह ७७ धावा केल्या. मुंडे याने ३७ धावा करताना सहा चौकार ठोकले. राजस्थानकडून के. अजयसिंग याने चार बळी घेतले तर दीपक चहार याने तीन गडी बाद केले. अनिकेत चौधरी याला दोन बळी मिळाले.
उर्वरित खेळांत राजस्थानची दुसऱ्या डावात १ बाद २२ अशी निराशाजनक सुरुवात झाली.
सामन्याचा रविवारी अखेरचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण निश्चित झाले आहेत. अखेरच्या दिवशी महाराष्ट्र संघ निर्णायक विजयासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
संक्षिप्त धावफलक- राजस्थान पहिला डाव ३१८ व १ बाद २२
महाराष्ट्र पहिला डाव १२०.५ षटकांत सर्व बाद ४०९ (राहुल त्रिपाठी ११९, चिराग खुराणा ७७, श्रीकांत मुंडे ३७, के. अजयसिंग ४/८७, दीपक चहार ३/९४, अनिकेत चौधरी २/६७).