थायलंडमधील पट्टाया शहराकडे आता जगातील सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. जागतिक अजिंक्यपद शरीरसौष्ठव आणि तंदुरुस्तीशी निगडित स्पर्धाची रणधुमाळी येथे गुरुवारपासून रंगणार आहे. भारताच्या ६० खेळाडूंच्या पथकातील महाराष्ट्राचे सात शिलेदार मेहनतीने शरीर कमवून जग जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. जगदीश लाड, अमित पाटील, सागर जाधव, किरण पाटील, नीलेश दगडे, मंदार चवरकर यांच्यासह प्रशिक्षक प्रवीण सकपाळ हे मराठमोळे चेहरे भारताला पदक मिळवून देण्यासाठी उत्सुक आहेत.

एका अपघातातून सावरलेल्या किरण पाटीलच्या कारकीर्दीचे गेली काही वष्रे नुकसान झाले. मात्र हे दु:स्वप्न मागे सारून आत्मविश्वासाने उभा राहिलेला किरण पाटील म्हणाला, ‘‘अपघातामुळे झालेल्या दुखापतीचा मोठा परिणाम कारकीर्दीवर घडला. जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत हंगेरीत मी सातवा आलो, तर मुंबईत सहावा आलो. त्यानंतर बँकॉकला झालेल्या स्पध्रेत सहभागीच होऊ शकलो नव्हतो. मात्र आता पूर्णत: तंदुरुस्त असून, वर्षांनुवष्रे जपलेले देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.’’

या स्पध्रेसाठी कोणते आव्हान असेल, हे विशद करताना किरण म्हणाला, ‘‘इराण आणि हंगेरीच्या खेळाडूंचे या स्पध्रेवर वर्चस्व दिसून येते. मात्र त्यांना मागे टाकून भारताची छाप यंदा नक्की दिसेल.’’

स्पध्रेच्या तयारीविषयी त्याने सांगितले की, ‘‘मन:शक्ती ही यशाची गुरुकिल्ली असते. त्याकडेच मी या स्पध्रेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहात आहे. मन:स्वास्थ उत्तम राखण्यासाठी मी गेले काही दिवस ध्यानधारणा केली. याशिवाय दररोज सात ते आठ तास सराव करतो.’’

नवी मुंबईतील जगदीश लाडने बँकॉक आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी रौप्यपदक जिंकले आहे. यंदा सुवर्णपदकाची आस बाळगणारा जगदीश म्हणाला, ‘‘एका स्पध्रेत चार गुणांनी, तर एकदा दोन गुणांनी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. हा फरक कमी करण्यासाठीच गेले काही काळ मी मेहनत करीत आहे. त्यामुळे पदकाचा रंग या वेळी निश्चित बदलेल अशी अपेक्षा आहे.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘आम्ही देशाला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो; पण सरकार, महानगरपालिका यांच्याकडून त्याची कदरसुद्धा व्हायला हवी. त्यांच्याकडून योग्य कौतुक मिळाले, तर खेळाला चांगले दिवस येतील.’’

भारताचे प्रशिक्षक प्रवीण सकपाळ यांनी स्पध्रेतील आव्हानाविषयी सांगितले की, ‘‘बँकॉकला गेल्या वर्षी झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत भारताने तीन सुवर्णपदकांसह एकंदर ११ पदके जिंकली होती. यंदा इराण, हंगेरी, थायलंड आणि उझबेकिस्तान या खेळाडूंचे विशेष आव्हान असेल; पण भारतीय खेळाडूंची तयारी पाहता किमान १५ पदके नक्की मिळतील.’’

महाराष्ट्राचे खेळाडू

  • मास्टर्स गट (४० ते ४९ वष्रे) : मंदार चवरकर
  • ९० किलो वजनी गट : जगदीश लाड, अमित पाटील
  • ९० ते १०० किलो : सागर जाधव, किरण पाटील, नीलेश दगडे.
  • प्रशिक्षक : प्रवीण सकपाळ

 

अफगाणिस्तान मायदेशी रवाना

जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठी अफगाणिस्तानचा संघ हा भारतमार्गे थायलंडला येणार होता. मात्र या पथकाला नवी दिल्लीहूनच मायदेशी परतावे लागले आहे. त्यांच्या परतण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.