जगातील सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ हे मी सर केले असले तरी मकालू शिखराचे आव्हान अधिक मोठे आहे. गतवर्षी7 आमचे यश थोडक्यात हुकले होते, यंदा मात्र हे अपयश धुवून काढण्यासाठी मंी सज्ज झाले आहे, असे एव्हरेस्ट विजेती पहिली महाराष्ट्रियन युवा महिला गिर्यारोहक कृष्णा पाटील हिने सांगितले.
कृष्णा हिने २००९ मध्ये एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर तिने आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच असलेली सहा शिखरे पादाक्रांत केली आहेत. गतवर्षी मकालू शिखरासाठी आशियाई ट्रेकिंग क्लबने आयोजित केलेल्या मोहिमेत कृष्णा सहभागी झाली होती. शिखरापासून अवघे दीडशे मीटर अंतर राहिले असताना तांत्रिक अडचणी व खराब हवामानामुळे  कृष्णा व अर्जुन वाजपेयी यांना माघारी परतावे लागले होते. यंदाच्या मोहिमेविषयी व अन्य उपक्रमांविषयी कृष्णाने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी मनमोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या.
एव्हरेस्ट मोहिमेत तू यशस्वी झाली होतीस. त्या तुलनेत मकालूचे आव्हान कसे आहे?
एव्हरेस्टपेक्षाही मकालू हे तांत्रिकदृष्टय़ा थोडेसे अवघड आहे. विशेषत: कॅम्प दोन ते कॅम्प तीन या टप्प्यात थोडीशी अवघड व नाकासमोर चढाई आहे. तेथे काही वेळा खराब हवामानामुळे खूप दमछाक होत असते. हा टप्पा ओलांडताना प्रत्येक अनुभवी गिर्यारोहकाची कसोटीच ठरते.
गतवर्षी या शिखराच्या मोहिमेतील तुझे यश कशामुळे हुकले ?
गतवर्षी अनेक ठिकाणी टणक बर्फ होता. त्यामुळे बूट बर्फावर ठेवणेही जड जात होते. पाय सटकण्याचा अनुभव अनेकवेळा आला. काही ठिकाणी आमच्या अपेक्षेपेक्षा आम्हाला जास्त लांब दोरी लावावी लागली. प्रत्यक्ष अंतिम चढाईच्या टप्प्यात आम्हाला दोर कमी पडला. तरीही आम्ही दोराचा उपयोग न करता शिखरापासून शंभर मीटर अंतरापर्यंत पोहोचलो होतो. जोराचे वारेही होते, त्यामुळे दोराचा उपयोग न करता शिखराची अंतिम चढाई करणे म्हणजे साक्षात मृत्यूस निमंत्रण देण्यासारखेच होते. त्यामुळे अतिशय निराश मनाने आम्हाला माघार घ्यावी लागली.
त्या वेळी अन्य संघांची मदत झाली नाही का ?
आमच्या मोहिमेच्या वेळी अन्य तीनच मोहिमा तेथे होत्या. मात्र दुर्दैवाने त्यांच्याकडेही दोर नव्हता. त्यामुळे त्यांनाही मोहिमा गुंडाळाव्या लागल्या.
एव्हरेस्ट विजयामुळे अन्य शिखरांकरिता आर्थिक निधी उभारण्यासाठी अडचण येत नसेल ना?
गिर्यारोहणाविषयी गेल्या पाच सहा वर्षांमध्ये सकारात्मक वातावरण झाले असले तरी अजूनही अशा मोहिमांसाठी निधी उभारताना अनेक अडचणी येतात. माझ्या एव्हरेस्ट मोहिमेनंतर अनेक ठिकाणी मला कार्यक्रमांसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र अशा ठिकाणीही मी विनाशुल्क कार्यक्रम करावेत अशीच अपेक्षा असते. निदान माझ्या मोहिमांसाठी त्यांनी मदत करावी अशी केवळ माझी नव्हे, तर सर्वच गिर्यारोहकांची अपेक्षा असते.  
मकालू मोहिमेसाठी यंदा निधी उभारताना काही अडचणी आल्या का ?
होय. यंदाही मला खूप प्रयत्न करावे लागले. मात्र सिडकोचे प्रमोद हिंदुराव यांनी त्यांच्या ओळखीच्या जोरावर मला भरघोस निधी मिळवून दिला आहे. दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांच्याशी ओळख झाली. त्याचा फायदा मला यंदा झाला. यंदा मी पुणे-मुंबई-अहमदाबाद-उदयपूर-जयपूर-नवी दिल्ली-गोरखपूर-काठमांडू असा जीपनेच प्रवास करणार आहे. काठमांडूपासून पुढेही काही प्रवास जीपनेच करणार आहे.
अवघड शिखरापूर्वी असा प्रवास करण्यामागचा उद्देश काय ?
मला लहानपणापासूनच गाडीने प्रवास करण्याची खूप आवड आहे. त्यामुळे मी यंदा असा प्रवास करण्याचे ठरविले आहे. अर्थात त्यामुळे दमछाक होणार नाही याची काळजीही मी घेणार आहे. काठमांडू येथे पोहोचल्यावर तेथील वातावरणाशी अनुकूल होण्यासाठी थोडासा सराव करणार आहे व त्यानंतर प्रत्यक्ष मकालू मोहीम सुरू होईल.
यंदाच्या मोहिमेचे आणखी काही वैशिष्टय़ आहे ?
माझ्याबरोबर यंदा विभू पांडे हा लघुपट निर्माता येणार आहे. अवघड मोहिमांमध्ये गिर्यारोहण करताना काय काय समस्यांना सामोरे जावे लागते याविषयी तो लघुपट करणार आहे. तो स्वत: एक चांगला गिर्यारोहक आहे. त्यामुळे आम्हालाही त्याची खूप मदत होणार आहे.
गिर्यारोहणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठीही तू प्रयत्न करीत आहेस. त्याबाबत काय सांगता येईल?
शालेय वयोगटातील मुला-मुलींना हिमालयातील मोहिमांचा अनुभव देण्यासाठी मी एक संस्था स्थापन करीत आहे. त्यांना मोठमोठय़ा शिखरांच्या बेसकॅम्पपर्यंत नेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्या खेरीज कापरेरेट क्षेत्रामधील लोकांमध्येही या साहसी खेळाची आवड निर्माण करुन देण्यासाठी मी विविध उपक्रम राबवणार आहे.