पीटीआय, क्वालालंपूर

भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी चुरशीच्या सामन्यात कोरियाच्या सिम यू जिनला तीन गेममध्ये पराभूत करत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याच वेळी युवा अश्मिता चलिहानेही तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या बिवेन झँगला नमवत सनसनाटी निकाल नोंदवला.

सिंधूने जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी असणाऱ्या कोरियाच्या यू जिनला ५९ मिनिटांत २१-१३, १२-२१, २१-१४ असे नमवले. यू जिनविरुद्ध सिंधूचा हा तिसरा विजय आहे. आता पाचव्या मानांकित सिंधूसमोर अग्रमानांकित हेन युईचे आव्हान असणार आहे. चीनच्या हेनविरुद्ध सिंधूची कामगिरी चांगली आहे. तिच्याविरुद्ध सिंधूने सहापैकी पाच सामने जिंकले आहेत.

महिला एकेरीच्या अन्य सामन्यात अश्मिता चलिहाने तिसऱ्या मानांकित बिवेन झँगला २१-१९, १६-२१, २१-१२ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुढच्या फेरीत तिच्यासमोर सहाव्या मानांकित चीनच्या झँग यी मानचे आव्हान असेल. पुरुष एकेरीत किरण जॉर्जला पाचव्या मानांकित ली झि जिआकडून १३-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा >>>IPL 2024: अंबाती रायडूने पराभवानंतर पुन्हा उडवली RCB ची खिल्ली, CSK चा व्हीडिओ पोस्ट करत डिवचलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुहेरीत अपयश

दुहेरीत भारतीय जोड्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीला कोरियाच्या सुंग शुओ युन आणि यु चिएन हुईकडून १८-२१, २२-२०, १४-२१ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. मिश्र दुहेरीत बी. सुमित रेड्डी आणि एन सिकी रेड्डीला चेन टँग जेइ आणि टोह ई वेई या अग्रमानांकित मलेशियाच्या जोडीकडून ९-२१, १५-२१ अशी हार पत्करावी लागली. दुसऱ्या मानांकित मलेशियाच्या पर्ली टॅन आणि थिना मुरलीधरन जोडीने भारताच्या सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर जोडीला २१-१७, २१-११ असे नमवले.