दोन आठवडे चाललेल्या प्रीमिअर बॅडमिंटन लीगनंतर (पीबीएल) भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आपला मोर्चा मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेकडे वळवला आहे. नव्या हंगामातील पहिल्याच स्पध्रेत सकारात्मक सुरुवात करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी तयारी केली आहे. बुधवारपासून या स्पध्रेला सुरुवात होत आहे.
विश्व अजिंक्यपद स्पध्रेत दोन वेळा रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू आणि २०१४मध्ये चीन खुल्या स्पध्रेत बाजी मारणारा किदम्बी श्रीकांत यांच्यावर भारताची मदार असणार आहे. दुखापत आणि खराब कामगिरीमुळे सिंधूला गेल्यावर्षी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती, परंतु नोव्हेंबरमध्ये मकाऊ खुल्या स्पध्रेत बाजी मारून सिंधूने पुनरागमनाची झलक दाखवली. तसेच पीबीएलमध्ये अपराजित राहत तिने मलेशियात जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या सिंधूसमोर पहिल्या फेरीत स्वित्र्झलडच्या सॅब्रिना जॅक्युटचे आव्हान असेल.
दुसरीकडे स्विस खुली आणि इंडियन सुपर सीरिजमध्ये जेतेपद पटकावून हंगामाची दणक्यात सुरुवात करणाऱ्या श्रीकांतला मध्यंतरानंतर कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. पीबीएलमध्येही त्याच्यात सातत्याचा अभाव दिसला. त्यामुळे फॉर्म मिळवण्यासाठी तो धडपडत आहे. मलेशिया मास्टर्स स्पध्रेत त्याच्यासमोर पहिल्याच लढतीत मलेशियाच्या वेई फेंग चाँगचे आव्हान आहे.
अजय जयरामनेही आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा करत डच खुल्या स्पध्रेचे जेतेपद आणि कोरिया सुपर सीरिजमध्ये रौप्यपदक पटकावले. तसेच पीबीएलमध्ये दिल्ली एसर्सकडूनही त्याने चांगली कामगिरी केली. त्याच्यासमोर जपानच्या तकुमार उएडाचे आव्हान आहे. पुरुष एकेरीत समीर वर्मासमोर जपानच्या शू ससाकीचे, तर बी. साई प्रणीतसमोर पात्रता फेरीतून मुख्य फेरीत येणाऱ्या खेळाडूचे आव्हान आहे. शुभांकर डे याचा सामना थायलंडच्या कंताफोन वँगचारोईनशी होईल.
महिला दुहेरीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीला मेई कुआन चोव आणि ली मेंग यीन या स्थानिक जोडीशी सामना करावा लागणार आहे.