संकेत गोलतकर, मुंबई

डोंबिवलीच्या मंदाकिनी आणि भक्ती या खामकर मायलेकींनी सध्या नेमबाजी क्रीडा प्रकाराद्वारे सर्वाचे लक्ष वेधले आहे. मंदाकिनी या महाराष्ट्र राज्य पोलीस दलात साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत, तर नुकत्याच झालेल्या राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह सर्वाधिक लक्षवेधी खेळाडूचा भीष्मराज बाम स्मृती पुरस्कार पटकावणारी भक्ती खालसा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

मंदाकिनी खामकर हवालदार म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या. परंतु नेमबाजीतील कौशल्याच्या बळावर त्यांनी मग मुख्य हवालदार आणि आता साहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत वाटचाल केली आहे. प्रारंभीच्या हलाखीच्या स्थितीवर मात करीत इथपर्यंत वाटचाल करणाऱ्या मंदाकिनी यांची मुलगी भक्तीसुद्धा त्यांच्या पावलावर पावले टाकून आंतरराष्ट्रीय क्षितिजावर लक्ष्यवेध करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘‘रायफल नेमबाजी स्पर्धेचा मला अनुभव असल्यामुळे मी भक्तीला या खेळात कारकीर्द घडवण्याचा सल्ला दिला. वरळी येथील महाराष्ट्र राज्य नेमबाजी संघटनेच्या नेमबाजी केंद्रावर मी तिला घेऊन जाऊ लागले. तिथे नेमबाजी प्रशिक्षक अरुण वारेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा प्रवास सुरू झाला. वयाच्या १६व्या वर्षांपासून ती डोंबिवली ते वरळी असा प्रवास करायला लागली. दररोज पाच ते सहा तास ती सराव करायची. भक्तीमध्ये असलेली गुणवत्ता हेरून वारेशी यांनी तिला मार्गदर्शन केले,’’ असे मंदाकिनी यांनी सांगितले.

२०१५मध्ये गणेश वासुदेव मावळणकर नेमबाजी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत भक्तीला कांस्य पदक मिळाले. त्यानंतर कनिष्ठ गटातील राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये तिने पदकांची लयलूट केली. मग २०१८मध्ये जर्मनी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. परंतु पदक मिळवण्यात ती अपयशी ठरली. २०१८मध्ये दक्षिण कोरिया येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही ती कनिष्ठ गटात सहभागी झाली. यावेळी क्निलिंग आणि प्रोन या प्रकारामध्ये तिने अव्वल कामगिरी केली, तर स्टँडिंगमध्ये निराशा केली.

आतापर्यंतच्या वाटचालीविषयी भक्ती म्हणाली, ‘‘आईमुळेच मला हा खेळ खेळण्याची प्रेरणा मिळाली. आता नोव्हेंबरमध्ये दोहा येथे होणाऱ्या आशियाई कनिष्ठ रायफल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पदके जिंकण्याचे माझे स्वप्न आहे.’’