माझ्याविरुद्ध हेतुपुरस्सरपणे कट -मेरी कोम

उपउपांत्यपूर्व फेरीची लढत सुरू होण्यास काही मिनिटांचा अवधी असताना कोणतेही कारण न देता संयोजकांनी जर्सी बदलण्याचे निर्देश दिले.

टोक्यो : उपउपांत्यपूर्व फेरीची लढत सुरू होण्यास काही मिनिटांचा अवधी असताना कोणतेही कारण न देता संयोजकांनी जर्सी बदलण्याचे निर्देश दिले. स्वत:चे आणि देशाचे नाव असलेली जर्सी घालण्यापासून भारतीय बॉक्सिंगपटूंना रोखणे, हा तर हेतुपुरस्सरपणे कट आहे, असा आरोप एमसी मेरी कोमने शुक्रवारी केला आहे. मेरी कोमने गुरुवारी आणि लव्हलिना बोर्गोहेनने शुक्रवारी आपल्या लढतींमध्ये जो गणवेश घातला होता, त्यावर त्यांचे आणि देशाचे नाव नव्हते. ‘‘लढतीचया पाच मिनिटे आधी मला गणवेश बदलायला सांगितल्यामुळे माझे मानसिक संतुलन ढळले. कारण त्याच  वेळी माझे नाव पुकारले जात होते,’’ असे मेरीने सांगितले. ‘‘भारताच्या जर्सीत मी आत्मविश्वासाने आधीची लढत खेळले होते. माझी मानसिक संतुलन बिघडावे, यासाठीच हा कट आखला होता,’’ असे मेरीने सांगितले. भारतीय बॉक्सिंग संघाचे उच्च कामगिरी संचालक सांतियागो निएव्हा यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमावर प्रकाशझोत टाकला. ‘‘बॉक्सिंगपटूला आपले आडनाव किंवा दिलेले नाव जर्सीवर नमूद करण्याची परवानगी आहे. त्यामुळे कोम हे आडनाव असते, तर ही समस्या आली नसती. लव्हलिनाच्या बाबतीतही हीच समस्या झाली. तिने बोर्गोहेन हे आडनाव असलेली जर्सी परिधान करायला हवी होती. त्यामुळे पूजा (राणी) आणि सतीश (कुमार) या पूर्ण नावाचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या नावाची समस्या होत नाही,’’ असे निएव्हा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mary kom boxing tokyo olympics 2020 ssh

फोटो गॅलरी