दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात निसटता पराभव पत्करणाऱ्या भारतापुढे मंगळवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात श्रीलंकेचे आव्हान असेल. अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय अनिवार्य आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल.
जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल या प्रमुख वेगवान गोलंदाजांपाठोपाठ डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाला झालेल्या दुखापतीमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने केवळ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनुभवी भुवनेश्वर कुमार (१/४०) आणि हार्दिक पंडय़ा (१/४४) यांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने भारताला सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीमध्ये अधिक समतोल साधण्यासाठी अक्षर पटेलला संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल.
दुसरीकडे, अफगाणिस्तानविरुद्ध सलामीचा साखळी सामना गमावल्यानंतर श्रीलंकेने सलग दोन सामन्यांत बांगलादेश (साखळी फेरी) आणि अफगाणिस्तान (अव्वल चार फेरी) यांना पराभूत केले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असून भारताविरुद्ध दमदार कामगिरी करून अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल.
’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २,
१ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)
मेंडिस, हसरंगावर मदार
सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेच्या संघाला सूर गवसला आहे. तिसऱ्या क्रमांकावरील चरिथ असलंकाचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या सर्वच फलंदाजांनी योगदान दिले आहे. बांगलादेशविरुद्ध सलामीवीर कुसाल मेंडिस आणि कर्णधार दसून शनाका यांनी, तर अफगाणिस्तानविरुद्ध दानुष्का गुणथिलका आणि भानुका राजपक्षे यांनी चमक दाखवली होती. मेंडिसने तीन सामन्यांत श्रीलंकेकडून सर्वाधिक ९८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्यांची लेग-स्पिनर वानिंदू हसरंगावर मदार आहे. त्याला फिरकीपटू महीश थीकशाना, दिलशान मधुशंका आणि चमिका करुणारत्ने यांची साथ मिळत आहे.
चहलच्या कामगिरीत सुधारणा गरजेची
भारताचा अनुभवी लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलने यंदाच्या स्पर्धेत निराशा केली आहे. त्याला तीन सामन्यांत मिळून केवळ एक बळी मिळवता आला आहे. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे ३२ आणि ४३ धावा दिल्या. त्यामुळे चहलच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. पाकिस्तानविरुद्ध प्रभावी मारा करणारे रवी बिश्नोई (१/२६) आणि अर्शदीप सिंग (१/२७) हे युवा गोलंदाज संघातील स्थान राखण्याची शक्यता आहे. अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला पुन्हा संघाबाहेर बसावे लागू शकेल. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर भारताची भिस्त आहे. तसेच ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणत्या यष्टीरक्षकाला संधी मिळणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.