मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावण्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाला भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आव्हान दिले असून दिवाणी न्यायालयाने त्यावरील निर्णय सोमवापर्यंत राखून ठेवला आहे.
मुंबईचे कायमस्वरुपी निवासी असलेल्याच एमसीएची निवडणूक लढविता येते, असे सांगत मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळून लावला होता. त्यानंतर मुंडे यांनी तत्कालिन अध्यक्ष रवी सावंत यांच्याकडे दाद मागितली होती. परंतु सावंत यांनी ती फेटाळली होती. मुंडे यांच्या निवडणूक ओळखपत्रावर त्यांचा निवासी पत्ता हा बीडचा असल्याचे नमूद आहे. त्यामुळे त्यांना एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्याने अपात्र ठरविले आहे. त्याविरोधात मुंडेंनी न्यायालयात धाव घेतली आहे. अतिरिक्त न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्यासमोर त्यावर शनिवारी सुनावणी झाली. त्या वेळी मुंडे यांची तसेच एमसीए, शरद पवार आणि अन्य प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय सोमवापर्यंत राखून ठेवला.
युक्तिवादाच्या वेळी मुंडेंतर्फे अॅड्. निरंजन भडंग व विवेकानंद गुप्ता यांनी शरद पवार यांच्या निवासी पत्त्याचा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित केला. एमसीएच्या निवडणुका होईपर्यंत लोकसभेच्या संकेतस्थळावर पवार यांचा निवासी पत्ता हा बारामती होता. एवढेच नव्हे, तर २००१ ते २०११ या कालखंडात एमसीएचे अध्यक्ष असतानाही त्यांच्याकडील निवडणूक ओळखपत्रावर बारामतीचाच पत्ता नमूद असल्याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच मुंडेंच्या पारपत्रावर मुंबईच्या निवासस्थानाचा पत्ता असून तोच त्यांचा कायमस्वरुपी पत्ता असल्याचाही दावा भडंग यांनी केला. त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निवडणुकीचा दाखला दिला. विलासरावांनाही सुरुवातीला एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आले होते. त्यांच्या निवडणूक ओळखपत्रावर लातूर हा त्यांचा निवासी पत्ता नमूद असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याला आव्हान दिल्यावर निवडणूक अधिकाऱ्याने त्यांच्या पारपत्रावर नमूद मुंबईचा निवासी पत्ता त्यांचा कायमस्वरुपी पत्ता मानत त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यामुळे विलासराव व मुंडे यांच्याबाबत दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल करीत भडंग यांनी मुंडेंचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यामागे कटकारस्थान असल्याचा आरोप केला. परंतु मुंडेंच्या या आरोपांचे एमसीएकडून खंडन करण्यात आले व त्यांना आवश्यक ती संधी दिल्याचे तसेच प्रक्रियेनुसारच त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला. तसेच आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्यामागे कट असल्याचा आरोप करणाऱ्या मुंडेंनी कटामागील हेतू सिद्ध करण्याचे आव्हान दिले.