मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीचे राजकीय रंग आता चढू लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध त्यांचा मुकाबला रंगतदार ठरणार अशी चर्चा सुरू झाली आहे. १८ ऑक्टोबरला होणाऱ्या एमसीएच्या प्रतिष्ठेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी क्रिकेट प्रशासकांप्रमाणेच राजकीय नेत्यांमध्येसुद्धा जोरदार चढाओढ दिसून येत आहे. परंतु मंगळवारी उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करणारे पहिले राजकीय नेते हा मान मुंडे यांनी संपादन केला.
‘‘एमसीएशी संलग्न क्लब्स आणि सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक सोयी-सुविधांसाठी त्यांना झगडावे लागत आहे. यात सुधारणा होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे सदस्यांच्याच आग्रहामुळे मी ही निवडणूक लढत आहे,’’ असे मुंडे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व शरद पवार यांना तुम्ही अध्यक्षपदासाठी आव्हान देणार का, या प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे लोकसभेतील उपनेते मुंडे म्हणाले, ‘‘मी अध्यक्षपदासाठी आधी अर्ज दाखल केला आहे. मी कुणाच्या विरोधात लढण्यासाठी किंवा पवारांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी लढत नाही. जर-तरच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही.’’‘‘मुंडे यांनी उमेदवारीसाठी आपले नामनिर्देशन पत्र मंगळवारी सादर केले. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. सध्या तरी अध्यक्षपदासाठी अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज आलेला नाही,’’ असे एमसीएचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले.
एमसीएच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर आहे. १२ ऑक्टोबरला या अर्जाची छाननी होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असेल.
मुंडे यांच्या अर्जावर आशिष शेलार यांनी सूचक आणि शाह आलम शेख यांचे अनुमोदक आहेत. निवडणूक लढण्यासाठी उमेदवार एमसीएशी संलग्न असलेल्या क्लबचा प्रतिनिधी असणे नियमानुसार अनिवार्य असते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना माझगावच्या स्टायलो क्रिकेट क्लबने गेल्या महिन्यात प्रतिनिधित्व दिले. माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्यामुळे एमसीएच्या निवडणुकीची उत्कंठा अजून टिकून आहे. हे दोन्ही क्लब्स शाह आलम शेख यांच्या मालकीचे आहेत.
केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी पारसी पायोनियरकडून प्रतिनिधित्व दाखल केले आहे. एमसीए निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु त्याआधीच त्यांना दोन गटांचा पाठींबा जाहीर झाला आहे. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘क्रिकेट फर्स्ट’ आणि रवी सावंत यांच्या नेतृत्वाखालील बाळ म्हाडदळकर गटांना त्यांना अध्यक्षपदासाठी पाठींबा दर्शवला आहे.
भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर दादर युनियनचे प्रतिनिधित्व करतात. याचप्रमाणे त्यांची पत्नी मनालीसुद्धा एका क्लबचे प्रतिनिधित्व करते. याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, आदी अनेक मंडळींनी एमसीए निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर क्लब्सचे प्रतिनिधित्व प्राप्त केले आहे. प्रत्यक्षात आणखी कोण मंडळी निवडणूक रिंगणात उतरतात, हे मात्र लवकरच स्पष्ट होईल.
१९९२-९३ ते २०१२-१३पर्यंत राजकीय नेत्यांनीच एमसीएच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रवी सावंत यांनी अध्यक्षपद सांभाळले.