दुखापतींचा ससेमिरा, धावांचा दुष्काळ आणि त्यामध्येच अ‍ॅशेस पराभवाचे शल्य यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अ‍ॅशेस मालिकेच्या अंतिम आणि पाचव्या कसोटीनंतर क्लार्क क्रिकेटला अलविदा करणार आहे. यंदाचा क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर क्लार्कने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती.
‘‘माझ्या कारकीर्दीतील अजून एक कसोटी सामना बाकी आहे आणि या सामन्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे,’’ असे क्लार्कने चौथ्या सामन्यातील पराभवानंतर सांगितले.
चौथ्या कसोटीतील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला ही मालिका १-३ अशी गमवावी लागली आहे. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना २० ऑगस्टपासून सुरू होणार असून क्लार्कचा हा ११५ वा कसोटी सामना असेल.
२०११ साली क्लार्कने रिकी पॉन्टिंगकडून ऑस्ट्रेलियाच्या संघाची सूत्रे घेतली होती. कर्णधार झाल्यानंतर क्लार्कने ३० सामन्यांमध्ये १२ शतके लगावली होती, पण गेल्या सहा सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याचबरोबर इंग्लंडबरोबरच्या गेल्या तीन मालिकांपैकी दोन मालिका ऑस्ट्रेलियाने क्लार्कच्या नेतृत्वाखाली गमावल्या आहेत.
‘‘ओव्हलवर मी क्रिकेटला अलविदा करणार आहे. क्रिकेट सोडायची इच्छा तर होत नाही, पण गेल्या वर्षभरात माझ्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झालेली नाही आणि हे मान्य करूनच मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट म्हणजे अ‍ॅशेस असेच समीकरण होते. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही अपयशी ठरलो. ही वेळ युवा पिढीने नेतृत्व करण्याची आहे,’’ असे क्लार्क म्हणाला.
क्लार्कने आतापर्यंत ११४ कसोटी सामन्यांमध्ये ४९.३० च्या सरासरीने ८६८२ धावा केल्या असून त्यामध्ये २८ शतकांचा समावेश आहे.

मायकेल क्लार्कची कसोटी कारकीर्द
सामने    धावा    सर्वाधिक    सरासरी     शतके    अर्धशतके    विकेट्स
११४       ८६१५      ३२९            ४९.५१        २८       २७          ३१
* पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावण्याचा विक्रम
* एका कॅलेंडर वर्षांत चार द्विशतके झळकावणारा एकमेव फलंदाज
* २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या कसोटीतील सवरेत्कृष्ट फलंदाज
* कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी
* कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी
* १२ पराभवांसह विदेशात सर्वाधिक कसोटी गमावलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार