Sachin Tendulkars Most Runs in Test Cricket Record: भारताचा सर्वकालिक महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात पहिलं द्विशतक ते कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा. शतकं, अर्धशतकांचाही विक्रम सचिनच्या नावावर आहे. पण कसोटी क्रिकेटमधील सचिनच्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने केलेलं विधान चर्चेत आलं आहे. “सचिनच्या पुढे जो रूटनं जाणं BCCI ला सहन होणार नाही”, असं मायकल वॉन म्हणाला आहे. एनडीटीव्हीनं यासंर्भातलं वृत्त दिलं आहे.
क्लब प्रेरी फाईर पॉडकास्टवर मायकल वॉन व अॅडम गिलख्रिस्ट यांच्याशी साधलेल्या संवादात जो रूटच्या सध्याच्या फॉर्मबाबत चर्चा झाली. यावेळी इंग्लंडच्या माजी कर्णधारानं जो रूटबाबत त्याचं मत व्यक्त केलं. श्रीलंका विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटनं दोन्ही डावांमद्ये द्विशतक झळकावलं आहे. त्यामुळे त्याच्या नावावर आता ३४ शतकं जमा झाली आहेत. ३३ वर्षीय जो रूटच्या नावे १२ हजारांहून जास्त धावा आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक १५,९२१ धावांचा विक्रम आहे. त्यामुळे रूट सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाला गवसणी घालू शकेल, असं मायकल वॉनचं म्हणणं आहे.
“मला वाटतं जो रूट जवळपास साडेतीन हजार धावांनी मागे आहे. त्याच्या हातात तीन वर्षं आहेत. जर त्याच्या पाठदुखीनं अडसर केला नाही, तर तो हे करू शकतो. त्याचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. मला वाटत नाही जो रूट इतक्यात थांबेल. त्याच्यावर आता कर्णधारपदाचं दडपणही नाही. त्याचा खेळही सध्या खूपच चांगल्या दर्जाचा होत आहे. त्यानं जर सचिनचा विक्रम मोडला नाही, तर मला आश्चर्य वाटेल. तो आत्तापर्यंत खूप छान खेळला आहे”, असं मायकल वॉन म्हणाला.
BCCI बाबत मायकल वॉची टिप्पणी!
दरम्यान, जो रूटचं कौतुक करताना मायकल वॉनने BCCI वर खोचक टिप्पणी केली आहे. “जर जो रूटनं सचिनचा विक्रम मोडला, तर ती कसोटी क्रिकेटसाठी आजतागायत झालेली सर्वोत्तम बाब असेल. कारण एखाद्या इंग्लिश खेळाडूनं सचिनचा विक्रम मोडून त्या यादीत सर्वोत्तम स्थान घ्यावं, अशी बीसीसीआयची अजिबात इच्छा नसेल. त्यांना त्या जागेवर कायम एक भारतीय खेळाडूच हवा असेल. कारण यानंतर आता तो विक्रम मोडण्यासाठी एखादा खेळाडू तिथपर्यंत पोहोचायला बरीच वर्षं लागू शकतात”, असं मायकल वॉननं नमूद केलं.
Duleep Trophy : एकेकाळी इंग्लंडचा केव्हिन पीटरसन दुलीप ट्रॉफीत ठरला होता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
अॅडम गिलख्रिस्टनं उपस्थित केली शंका
मायकल वॉन जो रूटबाबत सकारात्मक असला, तरी ऑस्ट्रेलियाचा महान विकेटकीपर-बॅटर अॅडम गिलख्रिस्टनं मात्र शंका उपस्थित केली आहे. “रूट सचिनचा विक्रम मोडेल की नाही हे मला सांगता येणार नाही. त्याचं वय आता ३३ हे. तो तरुण आहे. पण त्याची धावांची भूक कायम राहील की शांत होईल हे मला माहिती नाही. सध्या तरी ती शांत झाल्याचं दिसत नाहीये. पण असंच खेळत राहण्याची त्याची इच्छा आहे का? तो एकदिवसीय क्रिकेटमधून लवकरच निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या अॅशेस झाल्यानंतरच मी यावर बोलू शकेन”, अशी टिप्पणी गिलख्रिस्टनं केली आहे.